Eknath Shinde Cabinet : शिंदे सरकारमध्ये सांगली जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागणार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर या सरकारमध्ये (Eknath Shinde Cabinet) कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार? याची चर्चा सुरू आहे.
Eknath Shinde Cabinet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर या सरकारमध्ये कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार? याची चर्चा सुरू आहे. सांगली जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपच्या अनेक आमदारांना या सरकारमध्ये राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची आशा लागली आहे. शिवसेनेचे जिल्ह्यात एकमेव आमदार अनिल बाबर हे पहिल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. भाजप आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे आणि गोपीचंद पडळकर यांना देखील या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
अनिल बाबर यांचे पारडे जड
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर हे या मतदारसंघातून स्वतःच्या हिंमतीवर निवडून येतात. त्यामुळे बंडखोरी केल्यानंतर बहुतांश शिवसेना कार्यकर्त्यांनी अनिल बाबर हेच आमचा पक्ष आणि त्यांनी घेतलेली भूमिका हीच आमची भूमिका असं सांगितलं आहे.
अनिल बाबर हे एकनाथ शिंदे यांचे कट्टर आमदारांपैकी एक म्हणून सध्या ओळखले जातात. महाविकास आघाडी सत्तेत असताना या सरकारमध्ये शिवसेना आमदारांना किंमत मिळत नसल्याचे अनेकवेळा बोलून दाखवले होते .तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये आमचे म्हणणेच ऐकून घेतले जात नसल्याने महाविकास आघाडी फार काळ टिकणार नाही, असं जाहीर विधान अनिल बाबर यांनी काही महिन्यापूर्वीच केलं होतं.
महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना केवळ शरद पवारांमुळे अनिल बाबर यांची मंत्रिपदाची संधी हुकली असंही बोललं जात होतं. त्यामुळे त्यावेळी मंत्रिपदाची आशा असलेल्या बाबर यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता. मात्र, आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने अनिल बाबर यांना मंत्रिपद मिळण्याची आशा कार्यकर्त्यांना आहे
सुधीर गाडगीळ यांना मंत्रिपदाची भाजप संधी देणार?
सांगली विधानसभा मतदारसंघांमध्ये सलग दोन वेळा निवडून आलेले भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. एकनिष्ठ, शांत असलेल्या सुधीर गाडगीळ यांचे देखील शिंदे - फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाच्या शर्यतीत नाव आहे. जर सुधीर गाडगीळ यांना मंत्रिपद मिळाले, तर प्रथमच मंत्रिपदाची माळ गळ्यात पडणार आहे.
आमदार सुरेश खाडे दुसऱ्यादा मंत्री होणार?
महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याअगोदर देवेंद्र फडणवीस सरकारच्या अखेरच्या काळात मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. खाडेंकडे फडणवीस यांच्या मंत्री मंडळामध्ये सामाजिक न्याय विभागाचा कार्यभार देण्यात आला होता. मात्र, तो अगदी काही महिने असल्याने विशेष छाप खाडे यांना या मंत्रिपदकाळात पाडता आली नव्हती. त्यामुळे भाजपकडून पुन्हा एकदा सुरेश खाडे यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते.
आमदार गोपीचंद पडळकर मंत्री होणार!
शिंदे फडणवीस सरकारमध्ये फडणवीस यांच्या आशीर्वादाने आमदार गोपीचंद पडळकर यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. धनगर समाजाचा चेहरा म्हणून गोपीचंद पडळकर यांना भाजपकडून मंत्रीपद मिळू शकते. महाविकास आघाडी सरकारच्या गेल्या अडीच वर्षांच्या काळात सरकार वर जोरदारपणे आगपाखड करण्याचे काम पडळकर यांनी पार पाडले.
शरद पवार किंवा एकूणच राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात गोपीचंद पडळकर कधीही मागे हटले नाहीत. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये खासकरून फडणवीस गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देण्यासाठी आग्रही असणार आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या