(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray : महाविकास आघाडी सरकारची जाता जाता सांगली सिव्हिलसाठी मोठी घोषणा
महाविकास आघाडी सरकारने सरकार कोसळण्याच्या पूर्वसंध्येला सांगलीमधील गोरगरिबांचा आधार असलेल्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासाठी (सिव्हिल हॉस्पिटल) मोठी घोषणा केली आहे.
Uddhav Thackeray : महाविकास आघाडी सरकारने सरकार कोसळण्याच्या पूर्वसंध्येला सांगलीमधील गोरगरिबांचा आधार असलेल्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासाठी (सिव्हिल हॉस्पिटल) मोठी घोषणा केली आहे. या शासकीय रुग्णालयासाठी २३३.३४ कोटी रुपये खर्चाला सरकारकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सर्वोपचार (सांगली सिव्हिल) रुग्णालयाच्या ५०० खाटांची सुविधा असलेल्या चार मजली सुसज्ज इमारतीसाठी तसेच निवासी डॉक्टरांसाठी तीन मजल्यांचे वसतिगृह आणि अद्ययावत शवागार बांधण्यासाठी २३३.३४ कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली.
सिव्हिल हॉस्पिटलची सध्याची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे, तसेच आहे त्या, यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे. खाटांच्या अपुऱ्या संख्येमुळे गोरगरीब रुग्णांना जमिनीवर झोपावे लागत असल्याचे चित्र होते. या हॉस्पिटलच्या ठिकाणी नव्याने ५०० खाटांची सोय असलेली अध्यावत चार मजली इमारत उभी करण्यात यावी, त्याचबरोबर निवासी डॉक्टरांसाठी तीन मजली इमारत आणि अध्यावत शवागाराची गरजही पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात येत होती.
पृथ्वीराज पाटील यांनी सिव्हिल हॉस्पिटलमधल्या अडचणी सविस्तरपणे सरकार दरबारी आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या पुढे मांडलेल्या होत्या. पश्चिम महाराष्ट्रासाठी असलेल्या या हॉस्पिटलमध्ये कर्नाटकातील रुग्णही मोठ्या संख्येने येतात. कोरोना काळात तर या हॉस्पिटलवर खूप मोठा ताण पडला. यंत्रणा अपुरी पडू लागली. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत या हॉस्पिटलच्या नुतनीकरण प्रस्तावाला आणि त्यासाठीच्या खर्चाला तत्वतः मंजुरी मिळाली होती. आता या कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण करून सध्याच्या हॉस्पिटल जवळ असलेल्या मोकळ्या जागेत नव्या सिव्हिल हॉस्पिटलचे बांधकाम सुरू होईल, आणि अद्यावत इमारत उभी केली जाणार आहे. साधारणपणे ५२ हजार, ६७३ स्क्वेअर मीटरचे बांधकाम होणार आहे. या हॉस्पिटलमुळे पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांची, तसेच कर्नाटकातील रुग्णांचीही मोठी सोय होणार आहे.
सांगली जिल्हाधिकारी बदलीचा आदेश
फेब्रुवारी 2019 मध्ये सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.अभिजीत चौधरी यांची नियुक्ती झाली होती. काल रात्रीच चौधरी यांच्या बदलीचा आदेश निघाला. डॉ. अभिजित चौधरी यांची आता नुकतंच औरंगाबादचे नामकरण केलेल्या संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आलीय. तर सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आलीय.