Sharad Pawar NCP : इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
भर पावसामध्ये कार्यकर्त्यांकडून जयंत पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या. पाऊस थांबल्यानंतर जयंत पाटील पुन्हा व्यासपीठावर आले.
Sharad Pawar Shivswarajya Yatra in Islampur : गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज इस्लामपूरमध्ये पोहोचली आहे. या यात्रेची सांगता सभा इस्लामपुरामध्ये होता आहे. इस्लामपूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. बालेकिल्ल्यात शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा होणार असल्याने आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा घोषित झाल्याने या सभेला महत्त्व प्राप्त झालं होतं. मात्र, या सभेपूर्वीच जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र शरद पवार आणि पाऊस हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत असल्याने कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास चांगला दुणावला.
कार्यकर्त्यांनी डोक्यावर खूर्च्या घेत जागा सोडली नाही
त्यामुळे भर पावसामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पाऊस होत असताना सभास्थळी जयंत पाटील छत्री घेऊन उभे होते. भर पावसामध्ये कार्यकर्त्यांकडून जयंत पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या. पाऊस थांबल्यानंतर जयंत पाटील पुन्हा व्यासपीठावर आले. कार्यकर्त्यांनी डोक्यावर खूर्च्या घेत जागा सोडली नाही.
दरम्यान, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेची सांगता आज इस्लामपूर शहरात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या सभेला शरद पवार यांच्या बरोबर सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असताना राष्ट्रवादीची ही सांगता सभा म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यातील प्रचाराचा एकप्रकारे प्रारंभ करणारी सभा असणार आहे.
राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव, युवकांची बेरोजगारी, महाराष्ट्रातून परराज्यात जाणारे रोजगार, महिलांवरील अत्याचार या सर्व गोष्टी त्यांनी लोकांसमोर मांडून भ्रष्ट सरकारच्या भोंगळ कारभार यात्रेतून मांडण्यात आल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. 9 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या यात्रेचे इस्लामपूरपर्यंत 24 दिवस पूर्ण झाले. शिवस्वराज्य यात्रा या 24 दिवसात 19 जिल्हे पूर्ण केले. यात्रेसाठी तब्बल 7365 किलोमीटरचा प्रवास केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाचे बलस्थान असलेल्या सर्व मतदारसंघात ही यात्रा पोहचली असून पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन या मतदारसंघात केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या