Gopichand Padalkar : बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
Beed Jailor : बीडच्या जेलमध्ये सुरू असलेले भजन आणि कीर्तन बंद करण्यात आलं आहे, तिथल्या कैद्यांना धर्मांतरणासाठी लाखोंची ऑफर दिली जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केला.

सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) बीडचे कारागृह (Beed Jail) अधीक्षकांवर आरोप केला आहे. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे काम होते, सगळ्या महापुरुषांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलमधील श्लोक लिहिल्याचा आरोप पडळकरांनी केला. जेलमधील कीर्तन बंद करण्यात आलं. तर कैद्यांना धर्मांतरासाठी लाखो रुपयांचे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप पडळकरांनी केला. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या प्रकरणाची तपासणी करण्याची मागणी केली.
Beed Jail News : बीडच्या तुरुंगात कैद्यांच्या धर्मांतरणाचा प्रयत्न
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "बीडचे जे तुरुंग अधिकारी आहेत तिकडे ते धर्मांतराचं काम करत आहेत. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपतीची मूर्ती होती, ती काढून टाकलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, महात्मा गांधींचा फोटो काढून टाकलेला आहे. ते सर्व फोटो एका खोलीत टाकलेले आहेत. जेलमध्ये सगळे बायबल मधले श्लोक लिहिले आहेत. कैदी जेलमध्ये भजन कीर्तन करायचे, ते भजन कीर्तन पूर्णपणे बंद करून टाकलेल आहे. तसेच तिकडे त्या अधिकाऱ्याला भेटायला एक पादरी भेटायला येतो. कैद्यांना तुम्ही धर्मांतर करा तुम्हाला लाखो रुपये देतो अशा प्रकारची भूमिका तुरुंग अधिकारी घेत आहेत."
बीडमध्ये सुरू असलेल्या या सर्व प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून त्याची चौकशी करावी आणि तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करावं अशी मागणी केली आहे. तुरुंग अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास करावा अशी मागणी केल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकरांनी दिली.
Sangli Bank News : सांगली बँकेची चौकशी करावी
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी चौकशी सुरू आहे ती चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरू करावी. या मागणीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पडळकर म्हणाले.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागच्या वेळेस नोकर भरती घोटाळा झाला होता. त्या घोटाळ्याची चौकशी करावी आणि नव्याने नोकर भरती व्हावी अशी मागणी केलेली आहे. शेतकरी सहकारी सूतगिरणी यात देखील आर्थिक घोटाळा झालेला आहे. त्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी तिसरी मागणी केलेली आहे."
सांगली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे, सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी देखील मागणी केल्याचं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
Gopichand Padalkar Allegations : कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागे उभे राहावे
मराठवाड्यातील पूरग्रस्तांना कारखानदारांनी मदत करावी अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यावर बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, "माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भूमिका योग्य घेतलेली आहे की कारखानदारांना 10,000 कोटींची मदत केलेली आहे. मग जर असा प्रसंग शेतकऱ्यांवरती येत असेल तर कारखानदारांनी का उभा राहू नये? तुम्ही सरकारकडून मदतीची अपेक्षा करता आणि मग अशा बाबतीमध्ये तुम्ही परत माघार घेण्याची गरज नाही ना. तुम्ही पुढे यायला पाहिजे होतं."
ही बातमी वाचा:























