Sangli Crime : ब्रम्हनाळमध्ये कृष्णा काठी आढळलेल्या १४ फुटी मगरीचा मृत्यू, वनविभागाकडून अंत्यसंस्कार
Sangli Crime : पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीकाठच्या शेतात काल 14 फुटी मगर आढळून आली होती. ही मगर मृत झाल्याचे समोर आले आहे.
Sangli Crime : पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथे कृष्णा नदीकाठच्या शेतात काल 14 फुटी मगर आढळून आली होती. ही मगर मृत झाल्याचे समोर आले आहे. दोन महाकाय मगरीच्या भांडणात आणि या मगरीचे वय झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. मादी जातीची ही मगर होती.
काल नदी काठी ही मगर एका शेतात निपचित पडली होती. मगरील पाहण्यासाठी नागरिकानी बरीच गर्दी केली होती. शेतात मगर असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या कळवल्यानंतर कर्मचाऱ्यांना मगरीची बऱ्याच वेळापासून हालचाल होत नसल्याचे लक्षात आले.तिची तपासणी केली असता ती मयत झाल्याचे समोर आले. या मगरीचे शवविच्छेदन करून वन विभागाने तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
मगर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काल शेतीच्या कामासाठी सकाळी काही शेतकरी नदीकाठी गेले असता ही मगर दिसून आली. या मगरीचा व्हिडीओ देखील शूट केला. मात्र काहीकाळ मगरीची कोणतेही हालचाल दिसून न आल्याने वन विभागाला बोलावण्यात आले आणि मगर मृत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र या परिसरात नेहमीच मगरीचा वावर असल्याने उन्हासाठी ही मगर काठावर पडली असेल असे वाटले. परंतु बराचवेळ काहीही हालचाल दिसून न आल्याने काही धाडसी तरुणांनी जवळ जाऊन पाहिले. त्यावेळी त्यांना मगरीचे एक पाऊल व जबडा जखमी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याबाबतची माहिती वनविभागास कळवण्यात आली.
अधिकारी युवराज पाटील, वनरक्षक इक्बाल पठाण आणि कर्मचारी दाखल झाले. त्यांनी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून मगर मृत झाल्याची खात्री केली मादी जातीची ही मगर जखमी झाल्याने क्षीण होऊन मयत पावल्याचे त्यांनी सांगितले. ही मृत मगर एक दीड किलोमीटर उचलून वाहनापर्यंत वनविभागाने आणली. नंतर कुपवाड येथे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.मात्र अहवाल आल्यावरच मगर कश्यामुळे मयत झाली हे सांगता येणार असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.