Sangli News : वडिलांच्या पार्थिवाला लंडनमधून येत लेकीनं दिला अग्नी; मिरजेतील परदेशी-कायस्थ समाजाचे परिवर्तनशील पाऊल
रूढी व परंपरा तोडून विधवेला सन्मानासह हिंदू समाजात क्रांतिकारी बदल घडत आहेत. परंपरांच्या ओझ्याखाली दबलेल्या परदेशी-कायस्थ समाजातही परिवर्तन घडत असल्याचे सकारात्मक चित्र बुधवारी मिरज शहरात दिसून आले.
Sangli News : रूढी व परंपरा तोडून विधवेला सन्मानासह हिंदू समाजात क्रांतिकारी बदल घडत आहेत. वर्षानुवर्षे परंपरांच्या ओझ्याखाली दबलेल्या परदेशी-कायस्थ समाजातही परिवर्तन घडत असल्याचे सकारात्मक चित्र बुधवारी मिरज शहरात दिसून आले. आपल्या पित्याच्या पार्थिवाला मुलगीने अग्नी देण्याचा क्रांतीकारक निर्णय परदेशी-कायस्थ समाजाने घेतला. हा समाज सुध्दा परंपराच्या सीमा तोडून परिवर्तनवादी होत असल्याचे दिसून आले.
शहरात परदेशी-कायस्थ समाज मोठ्या प्रमाणात आहे. हा समाज अनेक वर्षापासून परंपरा व रूढीच्या ओझ्याखाली दबलेला होता. शहरातील शामलाल काशिलाल कायस्थ (वय 55 रा. बोलवाड रोड, मिरज) यांचे सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मयत शामलाल कायस्थ यांना एक मुलगा सिध्दार्थ व मुलगी श्वेता आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी मुलगा सिध्दार्थचे अकाली निधन झाले होते. मुलगी श्वेताही लंडन येथे राहते.
शामलाल कायस्थ यांचे सोमवारी निधन झाले. मात्र, मुलगी परदेशात असल्याने परदेशी-कायस्थ समाजाने मुलगी श्वेता याची लंडनहून येण्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला. श्वेताही आईसह बुधवारी दुपारी मिरजेत आली. रूढी व परंपरानुसार पिताच्या पार्थिवाला अग्नी मुलगा देतो. मात्र, मयत शामलाल यांच्या निधनापूर्वीच मुलाचेही अकाली निधन झाल्याने शामलाल यांना श्वेता ही एकमेव मुलगी राहिली. त्यामुळे शामलाल यांच्या पार्थिवाला अग्नी कोण देणार? असा प्रश्न परदेशी-कायस्थ समाजासमोर उपस्थित झाला.
समाजात मुलगा-मुलगी समानतेचे वारे वाहत असताना आपण अजूनही रूढी-परंपरा जपून मुलगीचा अधिकार डावलायचे का? असा मुद्दा कायस्थ-परदेशी समाजातील सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते शंकरलाल परदेशी यांनी उपस्थित करत मुलगी श्वेता हिलाच शामलाल यांच्या देहाला अग्नि देण्याचा मत मांडला. याला परदेशी-कायस्थ समाजाने एकमुखी पाठिंबा दिला. त्यानंतर कृष्णाघाट येथे मुलगी श्वेताने अग्नी देत अंत्यसंस्कार केले.
रूढी व परंपरा झुगारून परदेशी-कायस्थ समाजाने घेतलेल्या या क्रांतीकारी निर्णयाचा शहरात स्वागत व कौतुक होत आहे. हा निर्णय घेण्यासाठी परदेशी-कायस्थ समाजातील संजयलाल परदेशी, नरेंद्र परदेशी, बिंदूलाल परदेशी, गणेश परदेशी, पुरूषोत्तम परदेशी, मुकूंद परदेशी, नंदलाल परदेशी, संतोष कायस्थ, दिपकलाल परदेशी, प्रकाशलाल परदेशी, राजू हजारी, अष्टविनायक कायस्थ, राजू परदेशी, अनिल परदेशी, मनोज परदेशी आदी समाज बांधवांनी पुढाकार घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या