Baby Whale : अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनी समुद्रात सोडलेला बेबी व्हेल पुन्हा समुद्रकिनारी; प्रकृती चिंताजनक
Whale Fish At Ratnagiri : 40 तासांच्या प्रयत्नानंतर समुद्रात सोडलेला व्हेल माशाचे पिल्लू पुन्हा एकदा समुद्र किनाऱ्यावर परतले आहे. या बेबी व्हेलची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) गणपतीपुळे (Ganpatipule) येथे व्हेल माशाचं (Whale Fish) रेस्क्यू ऑपरेशन केलं गेलं. व्हेलला जिवंत पाण्यात सोडण्याचं हे देशातील पहिलं रेस्क्यु ऑपरेशन ठरलं आहे. तब्बल 40 तास या ठिकाणी व्हेलला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. त्यानंतर रात्री उशिरा व्हेल माशाचं पिल्लु समुद्रात सुखरूप गेले. मात्र, हा बेबी व्हेल पुन्हा एकदा गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी आला आहे.
मागच्या तीन दिवसांपासून बेबी वेलला खोल समुद्रात सोडण्याचे प्रयत्न सुरू होते. मंगळवारी रात्री सव्वा अकराच्या दरम्यान बेबी वेलला समुद्रात सोडण्यास यश मिळाले. मात्र, आज, बुधवारी (15 नोव्हेंबर) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बेबी व्हेल मासा पुन्हा समुद्रकिनारी आला. बेबी व्हेलची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
40 तास सुरू होती बचाव मोहीम
सोमवारी, 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 ते 7 वाजण्याच्या सुमारास व्हेल माशाचे पिल्लू किनाऱ्यावर असल्याचं दिसून आलं. दरम्यान, 13 नोव्हेंबर रोजी जवळपास तीन वेळा यावेळी माशाच्या पिल्लाला समुद्रात सोडलं गेलं. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी सकाळी हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी दिसले. त्यानंतर पुन्हा एकदा 'ऑपरेशन व्हेल' सुरू करून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास या व्हेल माशाच्या पिल्लाला समुद्रामध्ये सोडण्यात यश आले होते. मात्र, आता पुन्हा बेबी व्हेल समुद्र किनारी आला आहे.
बेबी व्हेलची प्रकृती चिंताजनक का?
पाण्याबाहेर खूप वेळ राहिल्याने व्हेलला शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही. त्याचबरोबर त्यांच्याच अंतर्गत अवयवांच्या वजनाने अंतर्गत रक्त्रस्त्राव, ऑर्गन फेल्युअर होते. अशा व्हेल माशांना पाण्यात सोडले तरी ते जास्त खोल जावू शकत नाहीत आणि भरतीबरोबर परत येतात, ते मृत होवूनच. ऑर्गन फेल्युअरमुळे त्याचा खूप वेदनादायक मृत्यू होतो. म्हणूनच काही देशात अशा व्हेलना पाण्यात सोडण्याऐवजी पशू वैद्यकीय डॉक्टरच्या सल्ल्याने वेदनारहित मृत्युसाठी मदत केली जाते.
20 फूट लांब, 5000 किलो वजन
तब्बल 20 फूट लांब आणि पाच टन वजनाचा हे व्हेल माशाचे पिल्लू आहे. समुद्रकिनाऱ्यावर अडकल्यानंतर पर्यटक, स्थानिक नागरीक, तज्ज्ञ, एमटीडीसीचे अधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते.
बेबी व्हेल माशाला समुद्रात सोडण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. भरतीच्या वेळी समुद्रात पाठवण्याचे दोनदा प्रयत्न केले. पण हा मासा पुन्हा किनाऱ्यावर आला आहे. दोन क्रेनच्या साह्याने या पाच टन वजनाच्या व्हेलला हलवणे कठीण झाले होते.