Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Raj Thackeray: हाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री नाही, तर भाजपचा मुख्यमंत्री आहे. सत्तांध झालेल्या या लोकांना लोक किंवा नागरिक मेले तरी चालतील, पण फक्त सत्ता पाहिजे, असे राज म्हणाले.

Raj Thackeray on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीला करप्शन आणि कन्फुजनची युती म्हटल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार पलटवार केला आहे. खासदार संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीमध्ये राज यांनी सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांवर हल्ला चढवला. 50 खोके म्हणजे 40 आमदारांसाठी 2 हजार कोटी रुपये झाले आणि हा पैसा भ्रष्टाचार किंवा घोटाळ्यांमधून आला असल्याचे ते म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तीन वर्षांत का झाल्या नाहीत, याचे प्लॅनिंग काय होते आणि कशासाठी त्या पुढे ढकलल्या गेल्या, हे मी नंतर सांगणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
अरे मग द्या ना ते पुरावे
राज ठाकरे म्हणाले की, "या सगळ्यांचा डोलारा नरेंद्र मोदींवर अवलंबून आहे. ही बसवलेली माणस आहेत. यामधील बसलेला माणूस कोणीच नाही. बसवलेला जो माणूस असतो तो फक्त धन्याचं ऐकतो. त्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं त्या सगळ्या गोष्टी करतात, त्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं वाटत नाही. ते पुढे म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नयेत. ते सिंचन घोटाळ्यात बैलगाडीभर पुरावे आहते म्हणत होते. आता म्हणतात की कोर्टात केस चालू आहे अरे मग द्या ना ते पुरावे? आपलं ते झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून या लेव्हलला आता ते आले आहेत. या देशामध्ये कोणी राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. सत्ता बदलत असतात, काळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो, हे एके दिवशी हे बदलेल.
सध्याचे राज्यकर्ते हे 'ससाणे' आहेत
राज म्हणाले की, सध्याचे राज्यकर्ते हे 'ससाणे' आहेत, जे मालकाच्या हातावर बसून आपलीच माणसे फोडण्याचे काम करतात, म्हणजेच स्वकीयांचा घात करत आहेत. या नेत्यांनी मराठी माणूस एकत्र येऊ नये, यासाठी जाती-जातींमध्ये भेद निर्माण करणे आणि वाद-भांडणे लावण्याचे राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री नाही, तर भाजपचा मुख्यमंत्री आहे. सत्तांध झालेल्या या लोकांना लोक किंवा नागरिक मेले तरी चालतील, पण त्यांना फक्त सत्ता पाहिजे.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण नाही, तर विद्रुपीकरण
राज यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, नाशिक या शहरांमध्ये अमली पदार्थ सहज उपलब्ध आहेत. गेल्या दहा वर्षांत ड्रग्सच्या विरोधातल्या धाडी बंद झाल्या आहेत आणि आता हा प्रकार शाळांपर्यंत पोहोचला आहे. राजकारणामध्ये वाढलेला पैसा आणि रस्त्यावर आलेले ड्रग्स यांचा संबंध तपासून पाहिला पाहिजे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण नाही, तर विद्रुपीकरण झालेले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















