Nilesh Rane : होमग्राऊंड राष्ट्रवादीच्या आमदाराचं, फॅक्टरी उदय सामंतांच्या निकटवर्तीयांची, गावकऱ्यांना दूषित पाणी प्यायला लागताच निलेश राणे भडकले
रत्नागिरीतील सावर्डे गावकऱ्यांना दूषित पाणी प्यावं लागतंय, प्रदूषण निर्माण करणाऱ्यांवर प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याच्या कारणावरून माजी खासदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.
रत्नागिरी : सावर्डे येथील कातभट्टीच्या दूषित पाण्यावरून राजकारण तापल्याचं दिसून आलं. अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम (Shekhar Nikam) यांच्या होमग्राउंडवर जाऊन कातभट्टीच्या दूषित पाण्याची माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्यक्ष जाऊन केली पाहणी. इथले ग्रामस्थ हे दडपणाखाली असून त्यांना दूषित पाणी प्याव लागतंय, तो प्रश्न आता सोडवणार असल्याचं सांगत निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय. यावेळी निलेश राणे यांनी पाहणी केलेली काताची भट्टी पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय सचिन पाकळे यांची असल्याची माहिती आहे.
नारायण राणे खासदार होताच पुत्र निलेश राणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. सावर्डे गावच्या नागरिकांना कातभट्टीमुळे दूषित पाणी प्यावं लागतंय असं सांगत त्यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. पाणी चांगलं असेल तर ते तुम्ही पिणार का असा सवाल निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या समोरच निलेश राणे यांनी धारेवर धरले.
फॅक्टरी कुणाचीही असो...
कंपनी कोणाचीही असू द्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असेल तर निलेश राणे लोकांच्या सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले की, जवळपास 12 वर्षांपासून इथले ग्रामस्थ काळे पाणी पित आहेत. ग्रामस्थ दडपणाखाली आहेत, ते स्वतःहून बोलायला तयार नाहीत. त्यांना दडपणातून बाहेर काढणार. जे कुणी कारखाना चालवतात, कोण मालक आहेत, ते माहिती नाही, पण त्यामुळे लोकांना काळे पाणी प्यावं लागतंय. विद्यार्थी आणि वयोवृद्धांचे आरोग्य धोक्यात आलंय. एका रिपोर्टच्या आधारे मी या ठिकाणी आलो. आता या लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळावं, त्यांचे आरोग्य चांगलं राहावं त्यासाठी त्यांची बाजू घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे.
ज्या अधिकाऱ्यांना काही घेणं-देणं नाही असे अधिकारी अनुपस्थित आहेत, त्यामुळे कुठेतरी प्रशासन देखील या कारखान्याच्या मालकांसोबत आहे का असा सवाल यावेळी निलेश राणे यांनी विचारला. मी ग्रामस्थांसोबत असून त्यांना यातून बाहेर काढणार, ग्रामस्थांना शुद्ध पाणी देण्याचं काम आमचं आहे अस आश्वासन निलेश राणे यांनी सावर्डे येथील भूवड वाडीतील ग्रामस्थांना दिलं.
निलेश राणेंनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारल्यानंतर संबंधित कंपनी बाबत क्लोजर नोटीस संदर्भात प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवला असं पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं.
ही बातमी वाचा: