Ratnagiri News : राजकीय संघर्षात मला अजित पवारांनाही अंगावर घ्यावे लागेल; भास्कर जाधवांचे वक्तव्य
Bhaskar Jadhav On Ajit Pawar : राजकीय संघर्षात आता अजित पवार यांनाही अंगावर घ्यावं लागणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले.
रत्नागिरी : राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्यानंतर आता राजकीय मित्रांमध्येही बदल होत आहे. कालपर्यंत सोबत असणाऱ्या नेत्यांनी एकमेकांना आव्हान देण्यास सुरुवात झाली आहे. आता, राजकीय संघर्षात अजित पवार यांनाही अंगावर घ्यावे लागेल, असे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले. शुक्रवारी, खेड-दापोली मतदार संघातील विशेष करुन रामदास आणि योगेश कदम यांच्या होम पीचवर भास्कर जाधवांची तोफ धडाडली. तालुक्यातील सवेली गावातील रामदास कदमांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार संजय कदम आणि भास्कर जाधवांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी भास्कर जाधव यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. कालपर्यंत तुम्ही शरद पवार यांच्या बाजूला होतात. म्हणून तुम्ही आमचे होतात आणि आम्ही तुमचे होतो. आता तुम्ही शरद पवार यांच्यासोबत नाही. तुम्ही भाजपच्या बाजूला गेला आहात.आता तुम्ही आमचे नाहीत आम्ही तुमचे नाहीत. सगळे माझ्या विरोधात उठणार आहेत, सगळे मला उद्या संपवायला उठणार आहेत. सगळे माझे राजकारण संपवायला प्रयत्न करणार आहेत. पण, मी कोणाला घाबरत नाही. ही लढाई तत्वांची आहे. लढाई विचारांची असून यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास जाधव यांनी व्यक्त केला.
मतदारसंघात पैशांचा धो धो पाऊस पडणार, पण...
भास्कर जाधव यांनी म्हटले की, येथील मतदारसंघात ही लढाई सोपी नाही. एका बाजूला प्रचंड प्रचंड प्रचंड पैसा धो धो पैसा पडणार आहे. मी नारायण राणेंना अंगावर घेतोय, मला माहिती मी देवेंद्र फडणवीस अंगावर घेतोय, मला माहित आहे मी एकनाथ शिंदे अंगावर घेतोय आणि आता अजित पवारांना सुद्धा अंगावर घ्यावं लागणार आहे. हे सगळे एकत्र आले आणि कदाचित उद्या माझा पराभव करतील. पण हा पराभव झाला तरी मला दुःख वाटणार नाही. पण परंतु महाविकास आघाडीची सत्ता मात्र महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहायचं नाही, असे आवाहनही भास्कर जाधव यांनी यावेळी केले.
आमच्या सारखी हिंमत दाखवा; जाधवांचे आव्हान....
मला सुद्धा दोन वेळा पक्ष सोडावा लागला असल्याचे जाधव यांनी म्हटले. एकदा शिवसेना आणि एकदा राष्ट्रवादी सोडावी लागली. शिवसेना सोडताना सुद्धा शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो. राष्ट्रवादी सोडताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो. जिल्हा परिषद सोडताना शिवसेनेचा राजीनामा देऊन बाहेर पडणारा संजय कदम आहे. तुमच्यात खरोखर नैतिकता असेल, तुमच्यात हिंमत असेल, 40 आमदारांपैकी एकाचाही पराभव होणार नाही, असा आत्मविश्वास दाखवताय तर आमच्यासारखी हिंमत दाखवून राजीनामा द्या असे थेट आव्हान भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाला दिले. उद्धव ठाकरे यांनी दिलेली आमदारकी ठेवायचे आणि त्याच उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घ्यायचं कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी केला.