Maharashtra News : सेनेने आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात : अनंत गीते
Maharashtra News : शिवसेनेनं आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी मागणी अनंत गीते यांनी केली आहे.
Maharashtra News : शिवसेनेतून (Shiv Sena) एक मोठा गट फुटून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत गेला. त्यामुळे सध्या शिवसेनेत मोठी फूट पडलेली आहे. एकनाथ शिंदे गटाने गुवाहाटीला गेल्यानंतर महाविकास आघाडीतून (Maha Vikas Aghadi) बाहेर पडण्याची मागणी केली होती. पण त्यानंतर देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सध्या आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) राज्यभर शिवसंवाद यात्रा काढत आहेत. शिवसेनेतून फुटून बाहेर गेलेल्या बंडखोर आमदारांना राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, असं आव्हान देत आहे. अशावेळी सध्या शिवसेनेतली जुनी फळी देखील सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे.
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) मागील काही दिवसांपासून कोकणातल्या राजकारणात सक्रिय नव्हते. पण रत्नागिरी इथे आल्यानंतर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेने आता आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केली आहे. त्यामुळे शिंदे गटात सोबत शिवसेनेमध्ये असलेल्या नेत्यांची देखील स्वबळाची, विकास आघाडीतून बाहेर पडण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. यावेळी गीते यांना शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांची देखील सारखीच इच्छा आहे. त्यांनी देखील अशीच मागणी केली होती. मग त्यांचं काय चुकलं? असा सवाल देखील विचारला गेला. त्यावेळी गद्दारांना याबाबत बोलण्याचा अधिकार नाही अशी प्रतिक्रिया दिली. पण आता अनंत गीते यांच्यासारख्या जुन्या जाणत्या, केंद्रीय मंत्री राहिलेल्या नेत्याने स्वबळाची मागणी केल्याने आगामी काळात पक्ष नेतृत्व याबाबत काय बोलणार? पक्षातील इतर नेते त्यांची भूमिका काय असणार हे पाहावं लागेल.
'नवीन आमदारांचा 'उदय' होणार'
शिंदे गटात कोकणातील पाच आमदार गेले आहेत. पण यातील एकाही आमदाराचा पुन्हा विजय होणार नाही. निवडणुकांमध्ये हे सर्व आमदार हरणार, अशी प्रतिक्रिया यावेळी गीते यांनी दिली. दरम्यान उदय सामंत हे देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. पण आता रत्नागिरीमध्ये नवीन आमदारांचा उदय होणार, अशी प्रतिक्रिया देखील अनंत गीते यांनी दिली. त्यामुळे अनंत गीते यांच्यासोबत उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष उदय बने हे शिवसेनेचे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवार असणार का? याबाबत देखील आता तर्क लढवले जात आहेत.
आणखी काय बोले गीते?
"मी उद्धव ठाकरे यांना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात दौरा करणार याची कल्पना दिली. शिवसेना संकटात असताना पाठीशी राहणे ही माझी नैतिक जबाबदारी असून शिवसेनेची वर्गवारी करता येणार नाही. कायदेशीर बाबतीत निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. सध्याची राजकीय स्तिथी पाहता शिंदे गटाची दखल घेण्याची गरज नाही. गद्दारी माझ्या रक्तात नाही नसून आजचे बंड भाजप पुरस्कृत आहे.", असा आरोप देखील यावेळी गिते यांनी केला. दापोली मंडणगड या विधानसभा मतदारसंघात रामदास कदम आणि योगेश कदम यांचे आव्हान नाही का? असा सवाल देखील अनंत गीते यांना पत्रकार परिषदेत विचारला गेला. त्यावेळी त्यांनी रामदास कदम यांना आव्हान देण्याच्या लायकीचे बनवले कुणी? असा सवाल केला. कोर्टच्या निकालानंतर सरकार कोसळेल असं देखील गीते यांनी यावेळी म्हटलं.