Ratnagiri Rain updates: रत्नागिरीत मुसळधार पाऊस, जगबुडीने इशारा पातळी ओलांडली; राजापूरच्या जवाहर चौकात पुराचं पाणी शिरलं
Ratnagiri Rain news: रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये सध्या जोरदा पाऊस सुरु आहे. अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूर आणि खेड शहरात पुराचे पाणी शिरले

Ratnagiri Rain news: अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने राज्यभरात धडाक्यात पुनरागमन केले आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. रविवारी रात्रीपासून रत्नागिरी (Ratnagiri Rain) जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर (Flood) आला आहे. खेड तालुक्यातील मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे
खेडच्या मटण मार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. खेड नगर परिषद प्रशासन आणि तालुका आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत. खेडमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे. जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर आल्यामुळे रत्नागिरीतील दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला आहे.
याशिवाय, संगमेश्वर तालुक्यात शास्त्री आणि सोनवी या दोन मोठ्या नद्यांना पूर आला आहे. रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्याकतील धामणी, संगमेश्वर इथं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील श्रद्धा हॉटेलला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. शास्त्री आणि असावी नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने या परिसरात अनेक हॉटेल आणि लॉजमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तर अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्याने राजापूर (Rajapur) शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी शिरले आहे.
Raigad Rain: रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा
रायगड जिल्ह्याला आज अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आज जिल्ह्याला रेड अलर्ट असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासन सुद्धा सज्ज असल्याचा पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून विश्रांतीसाठी गेलेल्या पावसानं पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. माणगाव तालुक्यातील कलमजे नदीला देखील मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने ही नदी प्रचंड वेगाने वाहू लागली आहे. एकीकडे माणगाव बायपासचे काम सुरू असल्यामुळे या नदी शेजारी खोदकाम करण्यात आल्याने पलीकडचे पाणी देखील या नदीला मिळाल्याने या भागाला पाण्याचा वेढा पडला आहे.
रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये दरड कोसळली
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड मुंबई राज्य मार्गावरील शेनाळे घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. दरड कोसळल्याने दगड-मातीचा ढिगारा रस्त्यावर येऊन पडला, ज्यामुळे वाहतूक एक तासासाठी पूर्णतः ठप्प झाली होती. घटनेच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने डोंगराच्या उतारांवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे, ज्यामुळे या भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. नागरिकांनी ठेकेदारावर चुकीच्या पद्धतीने काम करून डोंगर अस्थिर केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे या घाटातील रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे.
प्रशासनाने त्वरीत उपाययोजना करून रस्त्यावरचा मलबा हटवला असून, वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी प्रशासनाला वारंवार या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
Konkan Rain: कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट, समुद्रात उंच लाटा
कोकण किनारपट्टीवर समुद्राला उधाण आलं असून किनाऱ्यावर ३ ते ३.५ मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. समुद्राला उधाण (High tide) असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे सखल भागांत पाणी साचले आहे. होडावडे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने झाली आहे. तर तेरेखोल नदी पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून इशारा पातळीवर वाहत आहे. त्यामुळे नदी काढच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Rain Updates: रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस
१) मंडणगड -66.50 मिमी
२) खेड - 107.28 मिमी
३) दापोली - 96.14 मिमी
४) चिपळूण - 128.33 मिमी
५) गुहागर - 136.80 मिमी
६) संगमेश्वर - 129.50 मिमी
७)रत्नागिरी - 99.77 मिमी
८) लांजा - 139.60 मिमी
९) राजापूर - 118.00 मि मि
आजचा एकूण पाऊस = 1021.92 मिमी
आजचा एकूण सरासरी पाऊस -113.54 मिमी.
आणखी वाचा
महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह 16 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; पुढील दोन दिवस कसं असेल हवामान?


















