Cloudburst Rain: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी, अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, मे महिन्यात नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या
Heavy Rain in Chiplun: चिपळूणमधील सह्याद्री भागात अवकाळी पावसाचा कहर. मे महिन्यात ओढे झाले प्रवाहित. अडरे, अनारी भागात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाणीच पाणी. प्रचंड पाऊस झाल्याने नद्यांमध्ये पाण्याची पातळी प्रचंड वाढली आहे.
चिपळूण: राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होताना दिसत आहे. काही तास पावसाच्या सरी बरसल्याने उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळत आहे. परंतु, चिपळूणमध्ये रविवारी ढगफुटीसदृश पाऊस (Rain) झाला. चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य (Cloudburst) पावसाचे व्हिडिओ समोर येत आहेत. अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे, अनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या.
मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना या भागातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेला मुसळधार पाउस चर्चेचा विषय बनला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले.जुलै मध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला. या गावातील पाण्याने तुडुंब भरुन गेलेली शेतं आणि दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
अडरे आणि अनारी या गावांमध्ये अचानक इतका पाऊस कसा झाला, याविषयी हवामान खात्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. हवामान खात्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. परंतु, चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणाबाहेर पाऊस झाला आहे.
मान्सूनचे वारे अंदमानात दाखल होणार
भारताच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याकडून होऊ शकते. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाले आहेत. गेल्या 24 तासांत निकोबार बेटांवर मोठ्याप्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता नियोजित गणितानुसार सर्वकाही पार पडल्यास 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर 7 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
आणखी वाचा
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती