Rakesh Jhunjhunwala : अवघ्या 5 हजारापासून केली सुरुवात, जगाचा निरोप घेताना तब्बल 40 हजार कोटींचा मालक; असा होता शेअर मार्केटच्या बिग बुलचा प्रवास
भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Zunzunwala) आता आपल्यात नसले तरी त्यांची कहाणी आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याची कहाणी इतकीच रंजक आहे.
Rakesh Jhunjhunwala 63rd Birth Anniversary : भारतीय शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Zunzunwala) आता आपल्यात नसले तरी त्यांचा प्रवास आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. आज त्यांच्या 63 व्या जयंतीनिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सांगणार आहोत. राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करत 40,000 कोटींच्या संपत्तीचे मालक झाले.
राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै 1960 रोजी झाला. आज ते हयात असते , तर ते 63 वर्षाचे झाले असते. राजस्थानच्या झुंझुनूशी त्यांचा संबंध असल्याने त्यांच्या नावासोबत झुनझुनवाला जोडले गेले. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. शेअर मार्केटंमधील त्यांचा प्रवास इतका यशस्वी झाला की त्यांना भारताचा 'बिग बुल' म्हटले गेले आणि त्यांना भारताचे 'वॉरेन बफे' ही पदवी मिळाली. त्यांच्या असामान्य कामगिरीमुळे, भारत सरकारने त्यांना या वर्षी मरणोत्तर पद्मश्री देऊन सन्मानित केले.
गेल्या वर्षी राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले, त्यावेळी त्यांच्याकडे सुमारे 40 हजार कोटी रुपयांची संपत्ती होती. मात्र एवढी संपत्ती कमावलेल्या व्यक्तीचा प्रवास फक्त 5,000 रुपयांपासून सुरू झाला. राकेश झुनझुनवाला यांच्या कमाईचा मुख्य स्त्रोत शेअर बाजार होता आणि या बाजाराने त्यांना यशाचे सर्व दरवाजे खुले केले. राकेश झुनझुनवाला यांना शेअर मार्केटमध्ये आधीपासूनच रस होता. त्यांचे वडील घरी असताना त्यांच्या मित्रांसोबत नेहमी शेअर मार्केट बद्दल बोलायचे. शेअर मार्केटमध्ये त्यांना लहानपणापासूनच गुंतवणूक करायची इच्छा निर्माण झाली होती. परंतु त्यांच्या वडिलांनी सांगितले होते की पहिले पदवी घे मगच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कर, असा सल्ला त्यांनी दिला.
शेअर मार्केटची प्रेरणा वडिलांकडून मिळाली
शेअर मार्केटमध्ये (Share Market) येण्याची प्रेरणा राकेश झुनझुनवाला यांना वडिलांकडून मिळाली. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या झुनझुनवाला यांनी पहिल्यांदा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. यासोबतच वडिलांनी मित्र किंवा नातेवाईकाकडून कर्ज घेऊन बाजारात पैसे गुंतवू नयेत, अशा सूचनाही दिल्या. यानंतर झुनझुनवालाने आधी काही पैसे कमावले आणि नंतर शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला.
'टाटा-टी'ने पहिले यश दिले
झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये 5000 रुपये गुंतवून गुंतवणूकदार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यांना यशस्वी करण्यात टाटा समूहाच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. एकेकाळी त्यांनी टाटा टी या टाटा समूहाच्या कंपनीचे पाच हजार शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले. तीन महिन्यांत टाटा टीचा शेअर दर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यानंतर झुनझुनवाला यांनी ते 143 रुपयांना ते घेतलेले शेअर विकले. ही गोष्ट 1986 च्या सुमारातील आहे. झुनझुनवालांना या डीलमधून 2.15 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तीन महिन्यांत पाच लाख रुपयांचा नफा झाला.
टायटनने बिग बुल बनवले
त्यानंतरच्या तीन वर्षांत त्यांनी सुमारे अडीच कोटी रुपयांचा नफा कमावला. टाटा समूहाच्या आणखी एका कंपनीने त्याला 'बिगबुल' बनवले. 2003 मध्ये त्यांनी टाटा समूहाची कंपनी टायटनमध्ये पैसे गुंतवले. एकेकाळी झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे सुमारे 4.5 कोटी शेअर्स होते, ज्यांचे मूल्य 7000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये शेवटपर्यंत टाटाच्या शेअर्सचा मोठा हिस्सा होता. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये SAIL, Tata Motors, Tata Communications, Lupin, TV18, DB Realty, Indian Hotels (Indian Hotels), Indiabulls Houseing Finance, Federal Bank, Karur Vaishya Bank, Escorts Ltd, Titan Company, MCX यांचा समावेश होता.
राकेश झुनझुनवाला कुटुंब
राकेश झुनझुनवाला यांच्या वडिलांचे नाव राधेश्यामजी झुनझुनवाला हे आहे. ते इन्कम टॅक्स ऑफिसर होते. आईचे नाव उर्मिला झुनझुनवाला हे आहे. त्या गृहिणी आहेत. मोठ्या भावाचे नाव राजेश झुनझुनवाला हे आहे आणि ते चार्टर्ड अकाउंटंट आहे.राकेश झुनझुनवाला यांच्या मोठ्या बहिणीचे नाव सुधा गुप्ता आहे. लहान बहिणीचे नाव नीना संगनेरिया हे आहे. पत्नीचे नाव रेखा झुनझुनवाला आहे त्या सुद्धा शेअर मार्केट इन्वेस्टर आहेत. निष्ठा झुनझुनवाला त्यांच्या मुलीचे नाव आहे.राकेश झुनझुनवालांना दोन जुळे मुले झाली. त्यांचे नाव आर्यमन आणि आर्यवीर झुनझुनवाला आहे.