Raigad News : विना नंबर आणि नावाच्या संशयास्पद बोटीमुळे खळबळ, दुरुस्तीसाठी करंजा इथे आणल्याचं तपासात समोर
Raigad News : रायगड जिल्ह्यातील उरण शहरानजीक असलेल्या करंजा गावाच्या समुद्रकिनारी आढळलेली संशयास्पद मच्छीमार बोटीच्या दुरुस्तीसाठी तिथे आणल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
Raigad News : रायगड (Raigad) जिल्ह्यातील उरण (Uran) शहरानजीक असलेल्या करंजा गावाच्या समुद्रकिनारी आढळलेली संशयास्पद मच्छीमार बोटीच्या दुरुस्तीसाठी तिथे आणल्याची माहिती तपासात समोर आली आहे. उरण पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या बोटीचा शाफ्ट तुटल्याने ती दुरुस्तीसाठी करंजा इथे आणण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय या बोटीवर दोन खलाशी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या बोटीची कागदपत्रे तपासली जात आहेत.
नाव आणि नंबर नसल्याने बोटीबाबत संशय
उरण इथल्या करंजा समुद्रकिनारी एक संशयास्पद बोट ताब्यात घेतली असून उरण पोलीस तपास करत आहेत. रविवारी (25 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास मत्स्य विभागाचे अधिकारी गस्त घालत असताना उरणनजीकच्या समुद्रकिनारी मच्छीमारी बोट आढळली होती. या बोटीवर नाव आणि नंबर नसल्याने संशय निर्माण झाला होता. रेवस बंदरातील सुरक्षारक्षकांनी पाठलाग करत ही बोट ताब्यात घेतली. यावेळी, मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बोटीची चौकशी केली असता तिची कागदपत्रे न मिळाल्याने संशय निर्माण झाला होता. यामुळे, या घटनेची माहिती उरण पोलिसांना देण्यात आली असता या बोटीची तपासणी करण्यात आली. यावरुन, या बोटीची शहानिशा केली असता ही बोट मुंबईतील गोवंडी येथील श्रवणकुमार कनोजिया यांच्या मालकीची असून ती बोट ससूनडॉक येथील नवनाथ वराळ यांना मासेमारीसाठी देण्यात आली होती.
शाफ्ट तुटल्याने दुरुस्तीसाठी करंजा इथे बोट आणली
साईसागर असं या बोटीचं नाव असून शाफ्ट तुटल्याने त्याची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही बोट ससूनडॉक इथून करंजा येथे आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर या बोटीमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं असून त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान, या बोटीमध्ये सुमारे 250 लिटर अतिरिक्त डिझेल आढळून आल्याने अत्यावश्यक वस्तू विनिमय कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील महिन्यात हरिहरेश्वरला सापडलेल्या बोटीत शस्त्रास्त्र
मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर 18 ऑगस्ट रोजी माय लेडी हान नावाची संशयास्पद बोट सापडली होती. या बोटीची तपासणी केली असता त्यात तीन AK-47 रायफल आणि अनेक राऊंड्स गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता.
Raigad Suspected Boat : रायगडमध्ये पुन्हा आढळली संशयास्पद बोट
इतर महत्त्वाच्या बातम्या