Shivrajyabhishek Din 2024 : 'राजं सिंहासनाधीश्वर होणार...' रायगडावर 350 व्या राज्याभिषेक दिनाचा उत्साह,प्रशासकीय यंत्रणाही सज्ज
Shivrajyabhishek Din 2024 : शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने रायगड यंदाही दुमदुमणार असून यंदा 350 वा राज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे.
Shivrajyabhishek Din 2024 : संपूर्ण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा संपूर्ण महाराष्ट्र 350 वर्षांपासून ऐकतोय, गातोय. त्यामुळे महाराष्ट्रासाठी शिवजंयती त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन हे दिन अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यातच यंदा शिवराज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे शिवभक्तांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. यानिमित्ताने रायगडावरही तयारी पूर्ण झाली आहे.
अखंड महाराष्ट्राच्या मनामनात आणि इथल्या भूमीच्या कणाकणात महिरपी रुपात कोरलेला अभिमानास्पद क्षण म्हणजे जाणता राजा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. सूर्यदेवाने कुर्निसात करत, चंद्रमौळी किरणांचा वर्षाव अवघ्या राज्याभिषेकावर केला. या घटनेला आता 349 वर्षे सरली. मात्र आजही या सोहळ्याचं तेज उत्तरोत्तर वाढत गेलं. अजूनही ही मराठमोळी धरणी या क्षणांच्या आठवणींनी मोहरून जाते. दुर्गराज रायगडवर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो.
शिवभक्तांना पोलीसांचं आवाहन
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर येत असतात. त्यानिमित्ताने पोलीस प्रशाननाकडूनही संपूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे रायगडावर रोपवे असून त्यासाठी मर्यादा आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनी फक्त प्रशासन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच ही रोपवेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच इतरांसाठी नानेदरवाजा खुला राहणार आहे.
खबरदारी घेणं महत्त्वाचं - पोलीस प्रशासन
दरम्यान उद्या जर गडावर गर्दी झाली तर स्वयंशिस्त पद्धतीने जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे येणाऱ्या शिवभक्तांनी सूचनांचे पालन करणे गरजेचं असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्याचा राज्याभिषेकाचा दिन हा सर्वांचा उत्साह वाढणारा दिवस असून सकाळीच कोणी येण्याचा अट्टाहास करु नये असं आवाहनही पोलीस प्रशासनाने केलं आहे. त्यामुळे यंत्रणा जरी तयार असली तरीही खबरदारी घेणं महत्त्वाचं असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय.
सार्वभौम राज्याची स्थापना
‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या शिवराज्याभिषेकामुळे दिसून आलं. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारलं
महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरापगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र लढा सुरु केला. यामुळे गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मनातील आग स्वराज्याच्या प्रेरणेनं ज्वलंत झाली. स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवरायांना आदिलशाही, मुघलांशी लढा देताना स्वकीयांचाही सामना करावा लागला. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले.