Raigad : नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, वाहतूक ठप्प; दोन दिवस रेड अलर्ट
Raigad Rain Update : कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दहीवली येथील उल्हास नदीवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

Raigad Rain Update : आठवडाभरापासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि पुण्यात पावसाने हाहा:कार माजवलाय. हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला पुढील दोन दिवसांचा रेड-अलर्ट दिला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे अनेक भागातील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.
मंगळवार आणि बुधवार दरम्यान रायगड जिल्ह्याला 'रेड- अलर्ट' देण्यात आला होता. यादरम्यान, माथेरान, कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा, पेण, उरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यातच, बुधवारी सकाळपासून झालेल्या पावसामुळे नेरळ परिसरातील दहीवली येथील उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पुलावर पाणी साचले होते. यामुळे, नेरळ ते कळंब दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आल्याने बदलापूर, अंबरनाथकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले होते. तर, उल्हास नदीवरील पुलावरील वाहतूक बंद केल्याने सुमारे ३० गावांतील संपर्क तुटला होता.
तर, खालापूर येथील अंबा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने तुकसई गावाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यातच, सायंकाळच्या सुमारास खालापूर येथील सावरोली गावाजवळील पाताळगंगा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तर बुधवारी झालेल्या पावसामुळे रोहा येथील कुंडलिका नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीचे पाणी दुथडी भरून वाहत होती. त्यातच, नेरळ कळंब मार्गावरील उल्हास नदीच्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असुन पुलाची उंची वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
रायगडमध्ये शाळा बंद -
रायगड जिल्ह्यातही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय उद्याची पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील शाळा बंद ठेवण्यात आल्याची माहिती दिली. ज्याठिकाणी मुसळधार पाऊस असेल, तिथे शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
