Raigad : रायगडमधील EVM स्ट्राँग रूम फोडली? कपाटाचे दरवाजे उघडल्याने एकच खळबळ, मात्र...
Raigad Pen EVM Strong Room : रायगड जिल्ह्यातील पेण या ठिकाणी स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात आले होते. ज्या कपाटावर हे ईव्हीएम ठेवण्यात आले होते त्या कपाटाचे दरवाजे मात्र उघडल्याचं दिसून आलं.

रायगड : येत्या 21 डिसेंबरला नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांची मतमोजणी पार पडणार आहे. पण त्याआधीच सुरक्षा रक्षक आणि उमेदवारांच्या पहाऱ्यात असलेली स्ट्राँग रुम फोडल्याचा प्रकार, रायगडच्या पेणमध्ये समोर आला. पण ही स्ट्राँग रुम (Pen EVM Strong Room) कोणी माणसाने नाही तर चक्क उंदरांनी फोडलीय. हा सर्व प्रकार स्ट्राँग रुममध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला.
रायगडमधील पेणच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुममध्ये उंदरांचा सुळसुळाट असल्याचं समोर आलं. शनिवारी पहाटेच्या सुमारास स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशिन ज्या कपाटावर ठेवल्या आहेत त्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्याने एकच गोंधळ उडाला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये उंदरांचा हा प्रताप उघडकीस आला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Akola EVM Strong Room : अकोल्यात कडक बंदोबस्त
राज्यातल्या बहुतांश भागात ईव्हीएम स्ट्राँग रुमबाहेर विविध पक्षाच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून कडक पहारा दिला जात असल्याचं चित्र आहे. मात्र, अकोल्यात वेगळं चित्र पाहायला मिळातंय. अकोल्यातल्या चार नगरपालिका आणि एका नगरपंचायत अशा पाचही ठिकाणी ईव्हीएम स्ट्राँग रुमबाहेर 24 तास कडक पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे.
अकोल्याच्या तापमानाचा पारा दहा अंशांच्या आसपास पोचला आहे, तर ग्रामीण भागातलं तापमान दहा अंशाच्या खाली आहे. या कडाक्याच्या थंडीतही पोलीस डोळ्यात तेल घालून स्ट्राँग रुमाबाहेर कडक पहारा देत आहेत. अकोल्यातील अकोट, हिवरखेड, मूर्तीजापूर, बार्शी टाकळी आणि तेल्हारा या पाचही ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आहे.
Nashik EVM Strong Room : स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याची मागणी
नाशिकच्या मनमाडमध्ये स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवावे अशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी केली आहे. 21 डिसेंबरला नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे, तोपर्यंत ईव्हीएममध्ये छेडछाड होऊ नये यासाठी जामर बसवण्याची मागणी विविध पक्षांच्या उमेदवारांनी केली. जॅमर जर बसवला नाही तर ठाकरेसेना, राष्ट्रवादी आणि विविध पक्षांचे उमेदवारांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
Buldhana EVM Strong Room : बुलढाण्यात पोलिसांचा पहारा
बुलढाण्यातील सर्व दहा स्ट्राँग रूमची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 10 नगरपरिषदांच्या मतदान प्रक्रियेचा टप्पा 2 डिसेंबरला पार पडला आहे. त्यानंतर मशीन दहा ठिकाणच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहे. प्रत्येक स्ट्राँग रूमच्या बाहेर एकावेळी 25 पोलीस कर्मचाऱ्यांचा पहारा आणि सशस्त्र एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
ही बातमी वाचा:























