Sharad Pawar : चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्याची वेळ आलीय, शिर्डीतील टीकेला पवारांचं रायगडमधून उत्तर?
Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी दौऱ्यात अजित पवारांच्या समोर शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं. त्यावर शरद पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं.

रायगड : "देशात एकमतची गरज आहे. चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळं देशाच्या हितासाठी समविचारी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. देशाच्या हितासाठी एक संधतेचा विचार पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं. ते रायगडमध्ये बोलत होते. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Raigad Jilha Bank) लिमिटेड स्थलांतरीत श्रीवर्धन (Shrivardhan) शाखेचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. यावेळी शरद पवार, यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते एकाच मंचावर उपस्थित होते.
नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Shirdi) यांनी शिर्डी दौऱ्यात शरद पवारांनी देशातील शेतकऱ्यांसाठी काय केलं असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर शरद पवार मोदींच्या टीकेला उत्तर देणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
शरद पवार काय म्हणाले?
बँकेची उत्तम वास्तू बांधण्यात आली आहे. यासाठी उपस्थित रहता आलं. सहकार चळवळीत राज्याचं वेगळं स्थान आहे. देशाच्या सहकार चळवळीला महाराष्ट्राने एक वेगळी दिशा दिली आहे. वसंत दादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांनी चळवळीला बळ दिलं आणि त्यामुळं अनेक जिल्ह्यात बँक उभी राहीली. देशातील सहकारी बँक म्हणुन महाराष्ट्र बँक मोठी आहे. मी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चा केली. सातारा कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी या ठिकाणी असलेल्या बँका चांगल्या आहेत. बँकेची थकीत रक्कमेची माहिती घेतली की बँकेची नाडी कळते. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक याचे थकीत कमी आहे याचाच अर्थ बँक चांगली सुरू आहे.
राज्यात सहकार क्षेत्रात अनेक चांगल्या गोष्टी केली. साखर कारखाने यांचं कौतुक होतं, राज्यांत सर्वात जास्त कारखाने आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांचं अर्थकारण त्यामुळं सुधारलं आहे.
शेकापच्या जयंत पाटील यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. त्यामुळं थकीत कोणी ठेवणार नाही. सत्ता येते जाते परंतु संस्था नीट चालवायला हव्यात. व्यक्तिगत लाभाचा विचार न करता बँक चालवायला हवी. आज ए आर अंतुले यांचा उल्लेख झाला. पृथ्वीराज चव्हाण यांनी उल्लेख केला. अंतुले साहेब आणि मी केंद्रात एकत्र काम करत होतो. राज्याचा देशाच्या हिताचे प्रश्न आम्ही घेत असताना कोणतं खातं आपल्याकडे याचा विचार करत नव्हतो. देशाचा विचार करणारा नेता रायगड जिल्ह्याने दिला. सामान्य कुटुंबातील लोकांना अंतुले यांनी संधी दिली.
देशात एकमतची गरज आहे. चुकीच्या प्रवृत्तींना आळा घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळं देशाच्या हितासाठी समविचारी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. देशाच्या हितासाठी एक संधतेचा विचार पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
