CM Eknath Shinde : "तुमचा भाऊ आहे, काळजी करु नका"! मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन; उपोषणकर्त्यांसोबत फोनवरुन संपर्क
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गांसाठी उषोषणकरणाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे संवाद साधला. रखडलेल्या महामार्गाचं काम लवकरच होईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
रायगड : मुंबई-गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. गेली अनेक वर्ष या महामार्गाचं काम सुरु असून कोट्यवधी रुपये खर्च करुन त्याची अवस्था जैसे थे आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती आहे. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होतात. अनेक वर्षात अनेक आंदोलनंही झाली, मात्र मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था कायम आहे. या मुद्द्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधत माणगावमध्ये नागरिकांना आमरण उपोषणाला सुरुवात केली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या उपोषणाला सुरुवात झाली. या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.
रखडलेल्या मुंबई-गोवा मार्गासाठी आमरण उषोषण
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी (Mumbai Goa Highway) गुरुवारपासून उपोषण सुरु आहे. उपोषणकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा करून भेटीसाठी येण्याचे आश्वासन दिले आहे. "साहेब, मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था इतकी बेकार झाली की मी आता काय करू", असं आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडतं म्हटलं. "तुमचा भाऊ आहे तुम्ही काळजी करु नका", असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा मार्गाच्या उपोषणकर्त्यांना व्हिडीओ कॉलद्वारे आश्वासन दिलं आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
गेली 17 वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माणगावमध्ये अनेक संघटनांनी आमरण उपोषण केलं. सलग दुसऱ्या दिवशीही या कार्यकर्त्यांनी आपला उपोषण सुरू ठेवलं. शुक्रवारी या कार्यकर्त्यांना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी भेट देऊन थेट मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन संपर्क साधून दिला. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमचा भाऊ अजून आहे, त्यामुळे लवकरच या रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईल, असं आश्वासन दिलं आहे.