ST Bus In Flood: एसटी चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ; वाहत्या पुराच्या पाण्यातून बस चालवल्याने प्रवाशी संतापले
ST Bus In Flood: एसटी चालकाने प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला असल्याची घटना समोर आली आहे. एसटी चालकाने वाहत्या पुराच्या पाण्यातून बस चालवल्याने प्रवाशी संतापले.
Maharashtra ST Bus In Flood: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तर, काही ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकले आहेत. पुराच्या पाण्यातून वाहने चालवणे धोकादायक असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुराच्या पाण्यातून एसटी बस (ST Bus in Flood) चालवण्यात आली आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात सलग तीन-चार दिवस मुसळधार पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे अनेक गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी जात आहे. पाली खोपोली राज्य महामार्गाला पर्याय असलेल्या भेरव वाघोशी पुलावरून देखील पाणी जातना दिसत आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस, मोटारसायकल स्वार धोका पत्करून याच पुलावरून वाहतूक करीत आहेत. एसटी चालकाने तर चक्क प्रवाशांच्या जीविताशीच खेळ केल्याचे समोर आले आहे.
पुलावरून पाणी जात असताना एसटी चालकाने पूराच्या पाण्यातून एसटी चालवल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ पुलावरील वाहतूक थांबवावी अशी मागणी देखील स्थानिकांकडून केली जात आहे. संबंधित एसटी चालकावर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात देखील दोन वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती. परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चालक आणि वाहक या दोघांनाही एसटी महामंडळाने निलंबित केले होते.
सिंधुदुर्गात वाहन चालकाला अतिउत्साह नडला
सिंधुदुर्गात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला पूर आल्याने रात्री बांदा पंचक्रोशीतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. बांदा दानोली मार्गावर ही पाणी असताना एका बोलेरो पीकअप गाडीच्या चालकाचा अतिउत्साह त्याला चांगलाच नडला. रस्त्यात पुराचे पाणी असताना या बोलेरो पीकअप चालकाने त्या पाण्यातून गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या तो चांगलाच अंगलट आला. पाण्यात मध्येच गाडी बंद पडली आणि चालकाची पाचावर धारण बसली. नशीब बलवत्तर म्हणून जीवावर प्रसंग उदभवला नाही. सकाळी जेसीबी आणून गाडी बाहेर काढावी लागली.
पाहा व्हिडीओ: रायगडमध्ये वाहत्या पाण्यात एसटी नेल्यानं प्रवाशी संतप्त, प्रवाशांच्या जीवाशी खेळ