Raigad Politics: आदिती तटकरेंच्या मतदारसंघात गोगावलेंची नवी खेळी; शरद पवारांचा तटकरेंच्या विरोधात लढलेला नेता घेतला सोबत, पालकमंत्र्यांच्या तिढ्यात नवी गुगली
Raigad Politics: प्रवेशपूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्या समवेत अनिल नवगणे एका कार्यक्रमात उपस्थित होते. आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघात गोगावलेंनी मोठी खेळी खेळल्याची यानिमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.

रायगड - रायगडच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येऊ शकत नाही. रायगड मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील श्रीवर्धन मतदार संघातून मंत्री अदिती तटकरे यांच्या विरोधात यंदाची विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार अनिल नवगणे हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आज म्हसळा येथील एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे हे निवडणुकांनंतर प्रथमच एका व्यासपिठावर एका गुणगौरव सोहळ्यात एकत्र आल्याचे दिसून आले होते. यावेळी पूर्वाश्रमीचे हे आमचेच लोक होते, मागच्या निवडणुकीत त्यांना परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागला होता. आता येत्या 2 दिवसात ते स्वगृही परतत आहेत आणि तेच आम्हाला अपेक्षित आहे, त्यांचा असा निर्णय होईल असं शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावलेंनी म्हटलं आहे.
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. अनिल नवगणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 15 एप्रिलला शिंदे सेनेत प्रवेश होणार आहे. प्रवेशपूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्या समवेत अनिल नवगणे एका कार्यक्रमात उपस्थित होते. आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघात गोगावलेंनी मोठी खेळी खेळल्याची यानिमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.
कोण आहेत अनिल नवगणे?
अनिल नवगणे हे शिवसेना उबाटाचे जिल्हा सन 2021 पासून 2024 पर्यंत जिल्हा प्रमुख होते. मात्र, श्रीवर्धन मतदार संघ शरद पवार गटाकडे गेल्याने त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर नवगणे यांची उबाठाकडून हकालपट्टी करण्यात आली होती. सुनील तटकरे यांच्या कन्या आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या विरोधात ते यंदाची विधानसभा निवडणूक लढले होते. त्यामुळे सुनील तटकरे हे रायगडमध्ये शिंदे सेनेच्या आमदारांना शहा देण्यासाठी जसे राजकीय खेळी करत आहेत, त्याप्रमाणे गोगावले सुद्धा तटकरे यांच्या मतदार संघातून आता अनेक पदाधिकारी आपल्याकडे घेताना दिसत आहेत अशी चर्चा आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनिल नवगणे यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवारांनी म्हसळा येथे जाहीर सभा घेतली होती. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर अनिल नवगणे हे राजकारणापासून थोडे दूर होते. त्यांचा श्रीवर्धन मतदार संघात दांडगा अनुभव आहे. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागू शकतात. या पार्श्वभूमीवर नवगणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोलल जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा रायगड मधून मोठा धक्का मानला जात आहे.






















