पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? भाजप खासदार, आमदारांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढतेय
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील आणि सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांशी जवळीक वाढली आहे.यावरुन पश्चिम महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुणे : सत्तेसाठी भाजपमध्ये दाखल झालेले अनेक नेते राज्यात झालेल्या सत्ताबदलामुळे पुन्हा एकदा त्यांच्या मुळ पक्षाशी सलगी वाढवताना दिसतायत. सांगलीचे खासदार संजय काका पाटील आणि सातारचे शिवेंद्रराजे भोसले ही यातील आघाडीवरची नावं आहेत. भाजपकडून मात्र हे नेते भाजपमध्येच राहतील असा दावाकरण्यात येतोय. मात्र, या नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत वाढलेल्या भेटीगाठींमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ्याच चर्चांना सुरुवात झालीय.
भाजपचे सांगलीचे खासदार संजय काका पाटील जेवढे भाजपच्या कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत त्याहून अधिक अलीकडे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसायला लागलेत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे संजय काका हा सांगलीच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेत. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमधे दाखल झालेले संजय पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधे दाखल होणार अशी चर्चा सुरू असताना स्वतः संजय काकांनी मात्र त्याबद्दल मौन बाळगलय. त्यांच्या या मौनाचे बरेच अर्थ काढले जातायत.
सांगली शेजारच्या साताऱ्यामध्येही शिवेंद्रराजे भोसले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी भेटीगाठी वाढल्यात. काही दिवसांपूर्वी तर शिवेंद्रसिंहराजे अजित पवारांना भेटायला बारामतीला पोहचले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जेव्हा सातारा दौऱ्यावर असतात तेव्हा शिवेंद्रसिंहराजे त्यांच्या स्वागताला प्रत्येकवेळी हजर असतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शशिकांत शिंदेंसोबत संघर्षाची भाषा करणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंची भाषा अलिकडे मात्र मैत्रीपूर्ण झाल्याचं पहायला मिळतेय.
भाजपने मात्र या नेत्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठी या त्यांच्या जुन्या संबंधामुळे होत असल्याच म्हटलंय. त्याचबरोबर काँग्रेसमधील गोंधळाला कंटाळून आणि शरद पवारांच्या वयाकडे पाहून हे नेते भाजपमध्ये आलेले असल्यानं ते पक्षासोबत कायम राहतील असा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेल्या अशा नेत्यांची संख्या मोठीय. सत्तेशिवाय राजकारण करायची सवय नसलेल्या या नेत्यांची अस्वस्थता लपून राहिलेली नाही. विकास कामांसाठी आपण सत्ताधारी पक्षातील नेत्यांना भेटत असल्याचा दावा हे नेते करत असले तरी असाच दावा त्यांनी त्यांचा मुळ पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करतानाही केला होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे या नेत्यांच्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी होणाऱ्या भेटीगाठी चर्चेचा विषय बनत आहेत.