...म्हणून पुण्यातील मंचरची 'भगवान टोपी' देशभरात पसंतीला उतरली!
पुण्यातील मंचरची 'भगवान टोपी' सध्या देशभर पसंतीला उतरत आहे. ही 'भगवान टोपी' नेमकी नावारुपाला कशी आली यावरील हा स्पेशल रिपोर्ट.

पुणे : पुण्यातील मंचरची 'भगवान टोपी' सध्या देशभर पसंतीला उतरत आहे. दिग्गज नेत्यांना देखील याची भुरळ पडली आहे. त्यामुळेच ही 'भगवान टोपी' मंचरच्या अर्थकारणाचा कणा बनली आहे.
पुण्याच्या मंचरची 'भगवान टोपी'.... अर्थात कडक टोपी.... ही आगळीवेगळी टोपी सध्या देशभर अनेकांच्या डोक्यावर पहायला मिळते. दिवंगत खासदार किसनराव बानखेले आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे ही टोपी राजधानी दिल्लीत दाखल झाली. म्हणूनच आज काँग्रेस नेते राहुल गांधी ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील याच टोपीची भुरळ पडलेली आहे.
भगवान टोपी देशभरात पोहोचवण्यासाठी भुते कुटुंबीयांनी मोठी मेहनत घेतली आहे. अरुण भुते यांचे वडील भगवान भुते यांनी ग्राहकाच्या मागणीनुसार पहिली टोपी बनवली आणि या व्यवसायाचा श्रीगणेशा झाला. तर अरुण भुतेंनी त्यापुढे एक प्रयोग म्हणून 1980 साली कडक टोपीचा पर्याय अवलंबला तो ग्राहकांच्या पसंतीला उतरला. अन् म्हणूनच आज 'भगवान टोपी' नावारुपाला आली.
मंचरच्या मंडळीने तर भगवान टोपीला अक्षरशः डोक्यावर घेतलं. प्रत्येक शुभकार्यात हीच टोपी वापरत असल्याचं ते अभिमानाने सांगतात.
भुते कुटुंबीयांची हे यश पाहून अनेकांनी या व्यवसायात उडी घेतली. सध्या मंचरमध्ये वीस कारखाने सुरु आहेत. यातून आज एक हजार महिलांना रोजगारही मिळाला आहे.
मंचरमध्ये रोज 30 ते 35 हजार कडक टोप्या तयार होतात अन् यातून वर्षाकाठी दहा कोटींची उलाढाल होते. ही भगवान टोपी शुभकार्यात सन्मानाचा भाग बनते, हीच भगवान टोपी राजकीय पुढाऱ्यांची ओळख बनते अन् हीच भगवान टोपी पुण्यातील मंचरच्या अर्थकारणाला चालना देणारी ही ठरते.























