Who is Nilesh Ghaiwal: कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन करणारा निलेश घायवळ पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्राचा बादशहा कसा झाला? वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
Who is Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळ कोण आहे, त्याच्यावर इतक्या लोकांसमोर कोणी हात उचलला? मारणारा कोण होता, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पुणे: पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारा कुख्यात गुंड निलेश घायवळला काल (शुक्रवारी) मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये हा प्रकार घडला आहे. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात आली होती. निलेश घायवळ (Nilesh Ghaiwal) याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. काल (शुक्रवारी) रात्री कुस्ती सुरु असताना निलेश घायवळ हा पैलवानांना भेटण्यासाठी कुस्तीच्या फडात आला होता. त्यावेळी तिथे उभ्या असणाऱ्या एका तरुण पैलवानाने निलेश घायवळच्या कानाखाली लगावली होती. यानंतर कुस्तीच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. पैलवानाने निलेश घायवळ याला मारल्यानंतर त्याचे सहकारी मदतीला धावून आले होते. त्याने संबंधित पैलवानाला चांगलाच चोप दिला. मात्र, या सगळ्या गोंधळात हा तरुण पैलवान घटनास्थळावरुन निसटला. या घटनेमुळे पुन्हा एकदा कुख्यात गुंड निलेश घायवळ कोण आहे, त्याच्यावर इतक्या लोकांसमोर कोणी हात उचलला? मारणारा कोण होता, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कोण आहे निलेश घायवळ?
निलेश घायवळ हा कुख्यात गुंड गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. त्याच्यावर पुण्यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची मोठी दहशत होती. मात्र, गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गॅंगने घायवळवर दोनदा हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर देखील घायवळ टोळीने दिलं. दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली होती. कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. 2019 मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला. बाकी गुन्ह्यातदेखील घायवळला जामीन मिळाला आणि 2023 मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला.
घायवळ खंडणी, टोळीयुद्ध आणि इतर हिंसक गुन्ह्यांसह अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील आहे. घायवळचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये समोर आले आहे आणि तो पुण्यातील टोळी युध्द, हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यामध्ये होता. निलेश घायवळ मूळ राहणार सोनेगाव ता. जामखेडचा आहे. निलेश घायवळ विरोधात पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात 23 ते 24 गुन्हे दाखल आहेत. निलेश घायवळ उच्चशिक्षित आहे, त्याच मास्टर इन कॉमर्सपर्यंत शिक्षण झालं आहे.
निलेश घायवळ ई-कॉमर्सचा विद्यार्थी
बॉस (Boss) या नावाचा दबदबा पुण्याच्या गल्ल्या गल्ल्यात आहे. 2000 ते 2003 मध्ये आपलं नाव गुन्हेगारीतल्या वर्चस्वामध्ये गाजवलेल्या कुख्यात गुन्हेगार निलेश बन्सीलाल घायवळ हा मूळचा राहणार सोनेगाव ता. जामखेड मधला आहे. शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यात आला होता आणि त्याने मास्टर इन कॉमर्सची डिग्रीपर्यंत शिक्षणही पूर्ण केलं. त्यानंतर त्याची भेट गजानन मारणेसोबत झाली. गजानन मारणेसोबत या दोघांनी एका गुन्हेगाराचा खून केला. त्यानंतर दोघांनी सात वर्षाची शिक्षाही भोगली. जेलमध्ये बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक आणि वर्चस्वावरून वाद झाला.
निलेश घायवळवरती हात टाकणारा कोण?
निलेश घायवळ याच्यासारख्या नामचीन गुंडाच्या अंगावर हात टाकणाऱ्या तरुणाचे नाव समोर आले आहे. सागर मोहोळकर असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. तो पेशाने पहिलवान असून शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या जत्रेला उपस्थित होता. निलेश घायवळ हा फडातील पैलवानांना भेटत असताना सागर मोहोळकर हा गर्दीतून वाट काढत पुढे पोहोचला आणि त्याने थेट निलेश घायवळ याला मारहाण केली होती.
या घटनेनंतर वाशी पोलिसांनी सागर मोहोळकर याच्यावर पोलिसांसमोरच हाणामारी करुन गोंधळ घालण्याचा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, सागर मोहळकर याने निलेश घायवळ याला मारहाण का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु, निलेश घायवळ याच्यासारख्या दबदबा असलेल्या सागर मोहोळकरची सध्या धाराशिव आणि पुण्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.
निलेश घायवळ याच्यावर मोक्का, खुन, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, गर्दी जमवून दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, मारामारी असे गंभीर स्वरुपाचे एकूण 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरी निलेश घायवळ व त्याच्या साथीदारांविरुद्ध भिगवण पोलीस स्टेशनला अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता.
























