Pune Rain Update: पुण्यात संततधार सुरूच! हवामान विभागाकडून 6 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, पावसाचा जोर आणखी वाढला
Pune Rain Update: आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पहाटेपासून पुणे शहर परिसरात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे.
Pune Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा राज्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पहाटेपासून पुणे शहर (Pune Rain) परिसरात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. पुणे शहर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली आहेत.
आज पुण्यासह घाट माथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. तर, इतर ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पुणे जिल्ह्याला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पहाटेपासूव पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोल्हापूरला रेड अलर्ट, तर कोकणसह पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी
हवामान विभागाकडून आज राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापुरात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 3 दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता
आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे 4 ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी वर्तवली आहे. 4 ऑगस्टपर्यंत राज्यात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.
भाटघर धरणात 98 टक्के पाणीसाठा जमा
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेलं ब्रिटिशकालीन भाटघर आज सकाळी भरलं आहे. धरणात 98 टक्के पाणीसाठा जमा झाल्याने जलसंपदा विभागाच्या वतीने आज सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी धरणातील 45 स्वयंचलित दरवाजांची चाचणी घेण्यात आली आणि धरणांच्या सर्व संचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग निरा नदीत सुरू करण्यात आला आहे. सध्या 31 हजार क्युसेक्स इतक्या वेगाने हा विसर्ग करण्यात यैतोय. इंग्रजांनी 1927 मधे हे स्वयंचलित दरवाजे असलेलं धरण बांधलं होतं. या धरणातून पाणी सोडण्यात आल्याने उजणी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणं काठोकाठ भरली
पुणे शहराला (Pune City) पाणीपुरवठा करणारी चारही धरणं काठोकाठ भरली आहेत. अनेक धरणांमध्ये 90 टक्क्यांच्या वरती पाणीसाठा जमा झाला आहे.
पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा
- खडकवासला - 72.83 टक्के
- पानशेत - 90.72 टक्के
- वरसगाव - 92.82 टक्के
- टेमघर - 93.28 टक्के