आयुक्तांच्या घरी पाण्याचे प्रेशर ठीक पण त्यांना इतर प्रेशर जास्त, गिरीश बापटांचा टोला
Pune: भाजप खासदार गिरीश बापट यांनी आज थेट आयुक्त विक्रम कुमार यांच्या घरावर धडक देत त्यांच्या घरातील पाण्याचा प्रेशर तपासले.
Pune: भाजप खासदार गिरीश बापट यांनी आज थेट आयुक्त विक्रम कुमार यांच्या घरावर धडक देत त्यांच्या घरातील पाण्याचा प्रेशर तपासले. यावेळी आयुक्तांच्या घरातील पाण्याचे प्रेशर ठीक आहे, पण त्यांना इतर प्रेशर खूप असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे त्यांनी राज्य सरकारच्या प्रेशर खाली आयुक्त काम करत असल्याची टीका केली. पुणे शहरात कसबा, नाना पेठेसह अन्य भागांमध्ये कमी-जास्त दाबाने पाणीपुरवठा होत आहे. येत्या तीन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुधारला नाही, तर नागरिक रस्त्यावर येतील, असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी शनिवारी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देऊन सभात्याग केला होता. त्यानंतर आज गिरीश बापट यांनी पुण्याच्या पाणीप्रश्नावर आक्रमक होत थेट आयुक्तांच्या घरावर धडक मारली.
त्यांच्या घरातील पाण्याचा प्रेशर तपासले.
यावेळी गिरीश बापट म्हणाले, शहरात सर्वत्र समान पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर शहरात महापालिका 5 झोन तयार करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी टेक्निकल टीम नेमण्यात येणारं असून त्यांचे संपर्क क्रमांक लवकर घोषित करणार आहे. या सर्वांवर एक अतिरिक्त आयुक्त लक्ष ठेवतील, असे बापट यांनी सांगितले. तसेच शहरामध्ये 24 तास पाण्याच्या लाईन टाकण्याचे काम सुरू असून सर्वपक्षीय नगरसेवक यासाठी सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. पुढील दोन दिवसात पाणी प्रश्न काही प्रमाणात कमी होईल, असं देखील बापट म्हणाले.
गिरीश बापट यांनी शनिवारी कालवा समितीच्या बैठकीतून तावातावात काढता पाय घेतल्यानंतर लगेच आपण आयुक्तांच्या घरचा पाण्याचा प्रेशर चेक करण्यास जाणार असल्याचे सांगितले होते. तर पाणीपुरवठा सुधारला नाही, तर नागरिक रस्त्यावर येतील, असा इशारा देखील त्यांनी दिला होता. मात्र आज आयुक्तांच्या घरी पोहोचताना बापटांचा सूर बदलेला दिसला. आपलं आंदोलन हे आयुक्तांच्या विरोधात नसल्याचं गिरीश बापट यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि काही मोजके नगरसेवक घेऊन बापट यांनी आयुक्तांच्या बंगल्यात प्रवेश केला. यावेळी माध्यम प्रतिनिधींना मी निरोप दिल्यावर आत या असं बापट म्हणाले. मात्र अर्ध्या तासात गिरीश बापट आयुक्तांचा पाहुणचार घेऊन बाहेर आले. मात्र यावेळी 'पाण्याचं प्रेशर पाहण्यास आले आणि चहा-पाणी घेऊन गेले' अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.