Ajit Pawar: विधानपरिषदेवर जाण्यासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच! अजितदादांकडं केली 'या' नावाची मागणी; कार्यकर्त्यांनी अडवला रस्ता
Ajit Pawar: धनगर समाजाचे नेते विश्वास देवकाते यांना विधान परिषदेवरती संधी द्यावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत.
पुणे: विधानपरिषदेसाठी पक्षातील नेत्याला विरोध होत असतानाच आता आपल्या समाजाचा आमदार व्हावा अशा मागण्या जोर धरू लागल्या आहेत, याचा अनुभव आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील आला आहे. बारामतीमध्ये अजित पवारांसमोर (Ajit Pawar) आमच्या समाजाच्या नेत्याला आमदारकी मिळाली यासाठी धनगर समाजाने अजित पवारांसमोर जोरदार घोषणाबाजी केली
धनगर समाजाचे नेते विश्वास देवकाते यांना विधान परिषदेवरती संधी द्यावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार जनता दरबार घेण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे आले त्यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. गेल्या काही दिवसापासून विधान परिषदेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतो आहे. यामध्येच पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले विश्वास देवकाते अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. तसेच धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना आमदारकी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
त्याचबरोबर हातात छोटे छोटे फ्लेक्स घेऊन विश्वास देवकाते यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भावना पुढचा रस्ता अडवून धरला. धनगर समाजाचे नेते विश्वास देवकाते यांना विधान परिषदेवरती संधी द्यावी अशी मागणी करणारे फलक देखील त्यांनी हातात घेतले होते. अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेच्या आमदारकीची संधी विश्वास देवकाते पाटील यांना मिळाली पाहिजे यासाठी समर्थकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीतील राष्ट्रवादी भवनात शक्तीप्रदर्शन करत घोषणाबाजीने केली.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार जनसन्मान यात्रेमुळे राज्यभरात दौरे करत आहे. अशातच आज त्यांनी बारामतीतील काही गणेश मंडळामध्ये जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं आणि आरती केली, त्यानंतर काही विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बारामती परिसरात असतानाच पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते पाटील यांच्या समर्थकांनी देवकाते पाटील यांना विधान परिषदेची आमदारकीची संधी द्यावी या मागणी करत शक्तीप्रदर्शन केले आहे.
रूपाली ठोंबरे यांच्या पाठोपाठ रूपाली चाकणकरांचा नावाला पक्षातून वाढला विरोध
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी तीन नावांची लवकरच शिफारस केली जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी रूपाली चाकणकर (Rupali Chakankar), सिद्धार्थ कांबळे (Siddharth Kamble) आणि आनंद परांजपे (Anand Paranjape) यांची नावे दिली जाण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना विधानपरिषदेवर संधी मिळणार असल्याच्या चर्चेवर आता त्यांच्याच पक्षातील रूपाली ठोंबरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल रूपाली ठोंबरे (Rupali Patil) यांनी उपस्थित केला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याबद्दल आता पक्षातील रोष आणि असंतोष वाढताना दिसतोय. राज्यपाल नियुक्त जागांवर पक्षाकडून कळवल्या जाणाऱ्या तीन नावांत रूपाली चाकणकरांच्या नावाला पक्षातच विरोध होत असल्याचे पुढे आले होते. अशातच, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे यांनी विरोधात भूमिका मांडली होती त्या पाठोपाठ आता पक्षाच्या जेष्ठ नेत्या वैशाली नागवडे यांनीही चाकणकर यांच्या नावाला विरोध दर्शविला आहे. 'एबीपी माझा'शी बोलत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.