Pune Crime news : लिंबू, सुया... पु्ण्यातील वैकुठं स्मशानभूमीत चितेवर अघोरी प्रकार; दोन तृतीयपंथीयांना अटक
पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत थरारक प्रकार समोर आला आहे. दोन तृतीयपंथीयांनी चितेजवळ अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pune Crime News : पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत थरारक प्रकार समोर (Superstion) आला आहे. दोन तृतीयपंथीयांनी चितेजवळ अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चितेजवळ फोटो, लिंबू, सुया आढळले आहेत. या प्रकरणी जादूटोणा करणाऱ्या दोन (Pune police) तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (23 डिसेंबर) वर्षातली शेवटची अमावस्या होती. त्यापूर्वी गुरुवारी (22 डिसेंबर) रात्री तृतीयपंथीयांनी हा प्रकार केला आहे. हा प्रकार वैकुंठ स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्यांनी बघितला. त्यानंतर त्याने विश्रामबाग पोलिसांना या प्रकारासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार सुरु असताना काही वेळातच विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचले. त्यांनी दोन्ही तृतीय पंथीयांना रंगेहात पकडलं आणि दोघांनाही तातडीने अटक केली. रात्री दीड ते दोनच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. जादूटोणा कायद्याअंतर्गत दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील अमावस्येच्या दरम्यान जादूटोण्याचे प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी चितेवर लिंबू, टाचण्या आणि चक्क कोंबड्या टाकल्याचं समोर आलं होतं. या स्मशानभूमीत अनेकदा अशा घटना घडल्याचं कर्मचारी सांगतात. मात्र मागील दीड-दोन वर्ष असा प्रकार समोर आला नव्हता. या घटनेमुळे पुरोगामी पुण्यात अजूनही अंधश्रद्धेचे प्रकार सुरु असल्याचं दिसत आहेत.
जादूटोण्याच्या घटनेत वाढ
काही दिवसांपूर्वी पुत्र प्राप्तीसाठी उघड्या धबधब्यावर आंघोळ करायला लावल्याची घटना समोर आली होती. त्याप्रकरणी भोंदूबाबाला आणि कुटुंबियांना अटक करण्यात आली होती. त्या जोडप्याच्या विवाहाला चार वर्ष पूर्ण झाले होते. मात्र काही कारणामुळे त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. त्यामुळे कुटुंबियांनी सुनेला भोंदूबाबाच्या सांगण्यावरुन धबधब्यावर आंघोळ करायला लावली होती.
जादूटोण्याबाबत तक्रार करण्याचं आवाहन
परिसरात नरबळी, अमानुष अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादूटोणाच्या घटना घडल्यास किंवा निदर्शनास आल्यास नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी जादूटोण्याच्या दोन घटना समोर आल्या होत्या. त्या घटनेमुळे पुण्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा आणि जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.