Ujani dam: 36 तास शोध घेऊन कोणीही दिसलं नाही, अखेर सकाळी चार कलेवरं पाण्यावर तरंगताना दिसली, उजनी दुर्घटनेतील 4 मृतदेह सापडले
Maharashtra News: उजनी जलाशयात (Ujani) 6 जण बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झालं आहे.
इंदापूर: उजनी धरणात बोट उलटून बुडालेल्या सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत. गुरुवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवान शोधकार्याला सुरुवात करण्यासाठी उजनी धरणाच्या (Ujani Dam) परिसरात दाखल झाले. यावेळी तीन जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. यानंतर एनडीआरएफचे (NDRF) जवान हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. हे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांची ओळख पटवली जाईल. त्यानंतर काहीवेळातच एनडीआरएफच्या पथकाला चौथा मृतदेह सापडला. चार मृतदेहांमध्ये दोन पुरुष, एक महिला, एक लहान मुलाचा सामावेश आहे. मात्र, आता उर्वरित दोन मृतदेह कधी मिळणार, याची संबंधितांच्या नातेवाईकांना प्रतीक्षा आहे.
तब्बल गेल्या 36 तासांपासून उजनीच्या जलाशयात बेपत्ता झालेल्या सहा जणांना शोधण्यासाठी मोहीम सुरु होती. बुधवारी जवळपास 17 तासांनी एनडीआरएफच्या जवानांना बोट सापडली होती. ही बोट जलाशयाच्या तळाशी 35 फूट खोल पाण्यात आढळून आली होती. मात्र, काल दिवसभर शोध घेऊन एकही मृतदेह मिळाला नव्हता. त्यामुळे मृतांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिक संतप्त झाले होते. स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या अंधारातही मृतांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, महिलेची पर्स, मोबाईल आणि लहान मुलांच्या वस्तू यापलीकडे त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. उजनी धरणातील बोट दुर्घटनेत करमाळा तालुक्यातील झरे येथील जाधव दाम्पत्य व त्यांची दोन लहान मुले, कुगाव येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचा तरुण मुलगा आणि बोट चालक असे एकूण सहा जण बुडाले होते.
मृतांमध्ये कोणाचा समावेश?
या दुर्घटनेत बुडालेल्या प्रवाशांची नावे समोर आली आहेत. गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल दत्तात्रय जाधव (वय 25) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय 3) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय 35) गौरव धनंजय डोंगरे (वय 16 दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत.
मंगळवारी संध्याकाळी सोलापूर जिल्ह्यातील कुगाव पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील काळाशी येथे जाण्यासाठी हे प्रवासी बोटीने निघाले होते. त्यावेळी वादळी वारे वाहू लागल्याने बोट उलटी झाली. यावेळी बोटीवर सात प्रवासी होते. यापैकी एकजण पोहत बाहेर आला होता. त्यामुळे या दुर्घटनेची समोर आली. त्यानंतर उर्वरित सहा जणांचा शोध सुरु होता. मात्र, शोधकार्याच्या संथगतीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता.
आणखी वाचा