Uddhav Thackeray : बिहारच्या महिलांना 10 हजार दिले, आता मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना सहा महिन्यांचे हफ्ते एकत्र द्या; उद्धव ठाकरेंची मागणी
Uddhav Thackeray Pune Speech : एकीकडे पळून गेलेल्या उद्योगपतींचे हजारो कोटी माफ केले जातात, मात्र शेतकऱ्यांना आश्वासन देऊनही कर्जमाफी केली जात नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

पुणे : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना (Marathwada Farmers) आता मदतीची गरज आहे, पण केंद्र सरकार त्यावर काहीही करत नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्याने मोदी येतील आणि काहीतरी थातूरमातूर घोषणा करतील. बिहारमध्ये निवडणुका (Bihar Elections) असल्याने मोदींनी तिथल्या महिलाच्या खात्यात 10 हजार रुपये दिले. आता मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना एकत्रितपण सहा हफ्ते मदत म्हणून द्यावी असं आवाहन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलं. पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.
Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना सहा हफ्ते एकत्र द्या
मराठवाड्यात पूरस्थिती गंभीर आहे, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना, लोकांना मदतीची गरज आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, "सत्ता असो किंवा नसो, आम्ही तुमच्या मदतीसाठी आहे. ज्या परिस्थिती मराठवाड्यातील शेतकरी संपत आहे, त्या वेळी त्यांना मदत करणे आवश्यक आहे. विधानसभेच्या आधी लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे हफ्ते देण्यात आले. मग आता सहा महिन्यांचे हफ्त एकत्र द्या, आता पूरस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना गरज आहे."
बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींनी 10 हजार रुपये टाकले. त्या ठिकाणी निवडणुका आहेत म्हणून त्यांनी हे केलं. मग महाराष्ट्राला मदत का केली जात नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
Uddhav Thackeray On Vasant More : वसंत मोरे लोकांना आपले वाटतात
ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी शिवसैनिकांनी मदत करावी, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील नेते वसंत मोरे यांचे कौतुक केलं. ज्या ठिकाणी अन्याय होत होता त्या ठिकाणी वसंत तात्या हातात बांबू घेऊन जायचे आणि न्याय मिळवून द्यायचे. मुख्यमंत्री आला तरी नको, पण वसंत मोरे आले तर लोकांना आपलेपणा वाटायचा. त्यांना न्याय मिळण्याची शाश्वती वाटायची अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंचे कौतुक केलं.
Uddhav Thackeray On Marathwada Flood :उद्योगपतींची कर्जे माफ पण...
उद्धव ठाकरे म्हणाले की, "या देशातील उद्योगपतींनी हजारो कोटींचं कर्ज काढलं, नंतर ते फेडलं नाही आणि ते पळून गेले. नंतर या उद्योगपतीचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आलं. पण शेतकरी कधीच कर्ज काढून पळून जात नाही. ज्यावेळी आपण काढलेलं कर्ज फेडू शकत नाही असं वाटतं त्यावेळी तो आत्महत्या करतो. अशा शेतकऱ्यांचे कर्ज मात्र माफ केलं जात नाही."























