पुण्यात भिडे पुलाजवळ सेल्फीच्या नादात पाय घसरुन पडलेले दोन तरुण अजूनही बेपत्ता; शोधकार्य सुरू
पुण्यात भिडे पुलाजवळ सेल्फीच्या नादात पाय घसरुन पडलेले दोन तरुण अजूनही बेपत्ता आहेत. डेक्कनपासून मांजरीपर्यंत शुक्रवारपासून शोध सुरू आहे. मात्र, अद्याप दोघांचाही शोध लागला नाही.
पुणे : पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. अशातचं सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात पाय घसरून पडल्याने पुण्यातील बाबा भिडे पुलावरून दोन तरुण नदीपात्रात वाहून गेल्याचा घटना उघडकीस आली आहे. डेक्कनपासून मांजरीपर्यंत कालपासून शोध सुरू आहे. मात्र, अद्याप दोघांचाही शोध लागला नाही.
काय आहे घटना? पुण्यात धुवांधार पाऊस झाल्यामुळे नद्या नाल्यांना पूर आलाय. हे पाणी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी शहरातील बाबा भिडे पुलावर दोन तरुण सेल्फी काढण्यासाठी आले. सेल्फी काढताना एका तरुणाचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. मित्राला पाण्यात वाहून जाताना पाहून दुसऱ्यानेही त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. ओंकार तुपधर, (वय 17) सौरभ कांबळे (वय 20) अशी दोघांची नावे आहेत. काल (शुक्रवारी सायंकाळी 5.35 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. काल सायंकाळच्या सुमारास हे तरुण बाबा भिडे पूलावरून वाहून गेले. कालपासून आतापर्यंत शोधकार्य सुरू आहे. पण अजूनपर्यंत ही मुलं सापडली नाहीत. यात महापालिका आपत्ती व्यवस्थापन मदत करत नसल्याचा आरोप कुटुंबातील नातेवाईकांनी केला आहे. डेक्कनपासून मांजरीपर्यंत कालपासून शोध सुरू आहे.
पुण्यात परिस्थिती पुर्वपदावर
पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. गुरुवारी संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यामध्ये आता पाऊस थांबला आहे. कर्वेरोडवरचा नेहरु वस्तीमधील काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता वस्तीमधलं पाणी ओसरलं आहे. पण घरांमध्ये पाणी शिरल्याने खूप नुकसान झालं आहे. तसंच काही कोविड सेंटरमध्ये देखील पाणी शिरल्याने प्रशासनासह कोविड रुग्णांची देखील तारांबळ उडाली.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. या रस्त्यावरून काही प्रमाणात वाहन वाहतूक करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, काही वाहन याठिकाणी बंद देखील पडली आहेत. काही वेळासाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. कालच पुण्यातील पावसाचा जोर काही वेळात कमी होईल असा अंदाज वेधशाळेने दिला होता. पुण्यात मुसळधार पावसामुळं अनेक भागातील वीज गायब झाली होती. पाषाण, कर्वे नगर, बिबवेवाडी परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत गृह सर्वेक्षण स्थगित केले आहे.
Pune | पुण्यातील मुठा नदीपात्रावर सेल्फी काढताना दोन तरूण वाहून गेले, भिडे पुलावरील दुर्दैवी घटना