Pune Ganeshotsav 2022: भारतात शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याची भीती वाटत असेल तर पाकिस्तानात दाखवायचा का?; देखाव्यावरुन पुण्यातील गणेश मंडळ संतापले
देखाव्याला पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत या मंडळाला संबंधित देखावा उभारण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. देखाव्या वरुन कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार असेल तर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Pune Ganeshotsav 2022: पुण्यात दोन वर्षांनी जल्लोषात गणोशोत्सव साजरा होणार आहे. मात्र पुणे पोलिसांच्या काही निर्णयांमुळे गणेश मंडळांमध्ये तीव्र नाराजी बघायला मिळते आहे. गणेश चतुर्थीला काहीच दिवस बाकी आहे. त्यासाठीची तयारी देखील पुण्यात सुरु झाली आहे. मात्र देखाव्यांवरुन यंदा पुण्यात वाद होण्याची शक्यता दिसते आहे. गणपती मंडळाचे उत्तम देखावे बघण्यासाठी अनेक भाविक पुण्यात येतात. याच देखाव्यासाठी काही गणपती मंडळ प्रसिद्ध आहे. मात्र देखावे नेमके कोणत्या विषयावर करायचे? खरा इतिहास दाखवायचा नाही का? असे प्रश्न मंडळाकडून विचारण्यात येत आहे.
पुण्यातील कोथरुडमधील संगम चौकातील गणपती मंडळ उत्तम आणि क्रिएटीव्ह देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. यंदा या मंडळाने 'अफझल खान वध' हा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या देखाव्याला पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत या मंडळाला संबंधित देखावा उभारण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. देखाव्या वरुन कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार असेल तर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुण्यात दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने होणार असल्याने मंडळाचे कार्यकर्ते उत्साहात होते मात्र पोलिसांकडून काही निर्णय नाकारण्यात आल्याने मंडळांमध्ये नाराजीचा सुर बघायला मिळतो आहे.
देखावा हा समाजप्रबोधन करण्यासाठी असतो. आम्ही दरवर्षी अनेक वेगवेगळे देखावे साकारतो. यंदा 'अफझल खान वध' हा ऐतिहासिक जिवंत देखावा साकारण्याचा निर्णय घेतला होता मात्र पोलिसांनी या देखाव्यासाठी लागणारी परवानगी नाकारली. ही खरी घटना आहे. आपला इतिहास अनेकांना कळायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित जो काही इतिहास आहे तो दाखवण्यास काय भीती आहे? भारतात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याची भीती वाटत असेल तर पाकिस्तानात दाखवायचा का?, असा संतप्त प्रश्न संगम तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि मनसेचे नेते किशोर शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यात यंदा शेवटचे 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी
दरवर्षी शेवटचे चार दिवस रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकर लावायची परवानगी असते मात्र यावर्षी त्यात एक दिवस वाढवण्यात आला आहे. यावर्षी पाच दिवस लाऊडस्पीकरला परवानगी असणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात केली आहे. पोलीस आयुक्त आणि गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री काल पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळे गणेश मंडळांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
