Pune Ganeshotsav 2022: पुण्यातील गणेशोत्सवात यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचा देखावा; देखाव्यातून सत्तासंघर्षाची कहाणी मांडणार ?
पुण्यात सत्तासंघर्षाची कहाणी मांडणारा देखावासुद्धा बघायला मिळणार आहे. पुण्याचे प्रसिद्ध कलाकार सतीश तारु यांच्या स्टुडियोत हा देखावा तयार केला जात आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत.
Pune Ganeshotsav 2022: पुण्यात (Pune) दोन वर्षांनी होणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरु आहे. त्यासाठी गणपती मंडळदेखील आतुर आहेत. यंदाच्या गणपतीच्या देखाव्यावरुन वादावादीसुद्धा झाली मात्र पुण्यात आता सत्तासंघर्षाची कहाणी सांगणारा देखावासुद्धा बघायला मिळणार आहे. पुण्याचे प्रसिद्ध कलाकार सतीश तारु यांच्या स्टुडियोत हा देखावा तयार केला जात आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekntah shinde), शिवसेना नेते उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत.
यंदा महाराष्ट्रात मोठा सत्तासंघर्ष बघायला मिळाला. शिवसेना विरुद्ध शिंदे गटाचा राडा सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. एकनाथ शिंदे यांचं गुवाहातील बंडाने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यासोबत उद्धव ठाकरेंनासुद्धा राजीनामा द्यावा लागला होता. एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. हा सत्तासंघर्ष पुणेकरांना पुन्हा अनुभवता येणार असल्याची माहिती आहे. कारण पुण्यातील एका गणेश मंडळाने याच सत्तसंघर्षाचा देखावा साकारण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याच्या तारु यांच्या स्टुडियोत देखाव्यासाठी साकारण्यात आलेले विविध नेत्यांचे हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. या या प्रतिकृतींचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरणार सत्तासंघर्षाचा देखावा
दरवर्षी देखाव्यांवरुन पुण्यातील गणेश मंडळांमध्ये मोठी स्पर्धा बघायला मिळते. नवं आणि आकर्षित करणाऱ्या देखाव्याकडे गणेश मंडळांचा कल असतो. त्यात सध्या सुरु असलेल्या विविध घडामोडींवर देखावा साकारण्यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. यंदा कोणता देखावा साकारवा? यासाठी अनेक महिन्यापासून गणेश मंडळाची तयारी सुरु असते. अफझल खानाचा वध, शिवरायांचा प्रताप, शिवराज्याभिषेक सोहळा यांसारखे देखावे भाविकांचं लक्ष वेधून घेतात. मात्र यावर्षी सत्तासंघर्षाचा देखावा लक्ष वेधून घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे कोणताही राजकीय वाद सुरु होणार का? असा प्रश्नदेखील अनेकांना पडला आहे. मात्र या देखाव्यात नेमकं गुवाहाटीचं बंड असणार कि अजून काही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
देखाव्यासाठी प्रसिद्ध पुणे
पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी लाखो रुपये खर्चकरुन पुण्यातील गणेश मंडळ जिवंत देखावे आणि देशातील विविध देवांची मंदिरं साकारण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे देखावे पाहण्यासाठी आजूबाजूच्या शहरातील नागरीकसुद्धा पुण्यात गर्दी करतात. राजाराम मंडळात दरवर्षी देशातील महत्वाच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येते. यंदा हे मंडळ तिरुपती बालाजीच्या मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे.