अंतिम वर्ष परीक्षा, प्रश्नपत्रिकेच्या एमसीक्यू पॅटर्नला विद्यार्थी विरोध का करत आहेत?
बहुसंख्य विद्यार्थी आपआपल्या गावी परतल्याने त्यांचे पुस्तकं, नोट्स हे हॉस्टेलवर किंवा रुमवरच राहिले आहेत. त्यामुळे आत्ता ऐनवेळेस पूर्ण सिलॅबसचा अभ्यास करुन त्यावरून एमसीक्यू पॅटर्नचा पेपर कसा सोडवायचा हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.
पुणे : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाविद्यालयान अंतिम वर्षाच्या परीक्षा आता होणार आहेत. या परीक्षेची पद्धत कशी असेल, प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न कसा असेल, विद्यार्थ्यांना परीक्षा कशी देता येईल यासंदर्भातला अहवाल शासनाकडून जाहीर करण्यात येईल. पण यामध्ये प्रश्नपत्रिका ‘मल्टिपल चॉईस क्वेशन’ म्हणजेच एमसीक्यूच्या फॉर्मेटमध्ये असेल अशीही चर्चा सुरु आहे. पण प्रश्नपत्रिकेच्या एमसीक्यू पॅटर्नला विद्यार्थी विरोध करत आहेत. एमसीक्यू ऐवजी होम असायनमेंट किंवा ओपन बूक परीक्षा घ्यावी अशी मागणी बहुसंख्य विद्यार्थी करताना दिसताहेत.
एमसीक्यू पॅटर्न विद्यार्थ्यांना का मान्य नाही?
पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाच्या दरम्यान होणाऱ्या परीक्षा या सविस्तर लेखी पद्धतीने होतात. त्यामुळे एमसीक्यू पॅटर्नची अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सवय नाही. आता फक्त एक महिन्याच्या कालावधीमध्ये एमसीक्यू पद्धतीने कसा अभ्यास करायचा असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. यातच लॉकडाऊनच्या आधी बहुसंख्य विद्यार्थी आपआपल्या गावी परतल्याने त्यांचे पुस्तकं, नोट्स हे हॉस्टेलवर किंवा रुमवरच राहिले आहेत. त्यामुळे आत्ता ऐनवेळेस पूर्ण सिलॅबसचा अभ्यास करुन त्यावरून एमसीक्यू पॅटर्नचा पेपर कसा सोडवायचा हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.
यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे येथील अंतिम वर्षाचा विद्यार्थी साहिल पटेल याने सांगितलं की, “आमचा पेपर पॅटर्न हा पूर्णपणे थेअरी बेस होता. 5 वर्षांच्या या कोर्समध्ये आत्तापर्यंत एकदा सुद्धा एक मार्काचाही MCQ प्रकारचा प्रश्न आलेला नाही. आम्हाला ज्या परीक्षेच्या दृष्टीने शिकवण्यात आले ती परीक्षा पद्धती पूर्णपणे बदलून MCQ पद्धतीनुसार परीक्षा देण्याचे आव्हान विद्यापीठ अंतर्गत करण्यात येत आहे. यापेक्षा असायनमेंट देऊन परीक्षा घेऊ शकतात. गुणवत्तेच्या पलीकडे जाऊन विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा सुद्धा विचार करावा.”
असंच मत पुण्यातील ख्राईस्ट कॉलेजचा बीसीए तृतीय वर्षाचा विद्यार्थी शंतनू टिपालने मांडलं. “गेले 3 वर्षे आम्ही डिस्क्रिपटीव्ह पेपरचा अभ्यास केला. माझे विषय आणि अजुन काही विषयांसाठी एमसीक्यू पॅटर्न नव्हताच. आता अचानक आपण एमसीक्यू परीक्षा घेण्याचं सुरु आहे. आम्हाला एमसीक्यूची संकल्पनाच माहित नाही. कधी एमसीक्यू पद्धतीने पेपर झालेच नाही तर मग आता आम्ही परीक्षा कशी देणार?”
शिवाजी विद्यापीठातील इंजिनीयरींगच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी रवी पाटील याने होम असायनमेंटच्या पद्धतीनेच परिक्षा घ्याव्यात अशी मागणी केली आहे. “सर्वच विद्यापीठांत एकाच पद्धतीने म्हणजेच ‘होम असाईनमेंट’ पद्धतीनेच घ्याव्यात. हा निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा. मागच्या 3-4 दिवसांपासून परीक्षांबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत त्यामुळे विद्यार्थी भयभयीत व पॅनिक होत आहेत.” शासनाच्या अधिकृत घोषणेकडे विद्यार्थींचं लक्ष लागलं आहे.