(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विद्यापीठांमधील विद्यार्थी निवडणुका सुरू व्हाव्यात : केंद्रीय न्यायमंत्री प्रा. एस.पी.सिंग बघेल
Pune News Update : देशातील सध्याचा राजकीय प्रवाह एका स्थित्यंतरातून जात आहे. अशा परिस्थितीत राजकीय पटलावरील भावी युवा नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय छात्र संसद महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल, असे मत केंद्रीय कायदा व न्यायमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल यांनी व्यक्त केले.
पुणे : विद्यापीठांमधील बंद झालेल्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा केंद्रीय कायदा व न्यायमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल यांनी व्यक्क केलीय. भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल आफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. कैलासवादिवू सिवन, पर्यावरण अभ्यासक पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी, जे.के. उद्योग समूहाचे सीईओ अनंत सिंघानिया आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती कौशिकी चक्रवर्ती हे या कार्यक्रमासाठी अतिथी उपस्थित होते.
विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांमधील स्थगित असलेल्या विद्यार्थी निवडणुका पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत. देशातील सध्याचा राजकीय प्रवाह एका स्थित्यंतरातून जात आहे. अशा परिस्थितीत राजकीय पटलावरील भावी युवा नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय छात्र संसद महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल, अशी अपेक्षा बघेल यांनी व्यक्त केली.
"रामराज्य हे आदर्श प्रशासनाचे उदाहरण होते, हे आपण आजही मान्य करतो. एमआयटी विद्यापीठासारख्या शिक्षणसंस्था यापुढे देशाला विश्वाच्या पटलावर विश्वगुरू ही संज्ञा प्राप्त करून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलतील, यात शंका नाही, असा विश्वास बघेल यांनी यावेळी व्यक्त केला.
डॉ. कैलासवादिवू सिवन यांनी देखील यावेळी आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. "अंतराळ संशोधन आणि विज्ञान तंत्रज्ञान हे फक्त राकेट, क्षेपणास्त्रे, उपग्रह प्रक्षेपकांच्या निर्मितीपुरते मर्यादित नाही. या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला होणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. त्याच्या वापरातून ग्रामीण जनतेच्या कष्टमय आयुष्यात बदल घडले पाहिजेत. अंतराळ संशोधनातील नव्या शोधांमुळे आता आपल्याला वादळे, नैसर्गिक आपत्ती यांची पूर्वसूचना देणे शक्य होत आहे, ज्यामुळे मनुष्य आणि वित्तहानी टाळता येणे शक्य झाले आहे. तसेच मच्छिमार आणि शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेणे शक्य झाले आहे, डॉ. कैलासवादिवू सिवन यांनी यावेळी सांगितले.
"आगामी काळात मी केवळ आत्मनिर्भर भारताचे स्वप्न न पाहता, सारे जग आपल्यावर अवलंबून असल्याचे चित्र पाहात आहे. आगामी काळात लवकरच कल्पनातीत अशी तंत्रज्ञानक्रांती घडून येणार आहे. अशा काळात विद्यार्थ्यांनी नवे मार्ग, नव्या वाटा, नव्या दिशांचा ध्यास घेतला पाहिजे. प्रगती, यश यांच्या नव्या व्याख्या समजून घेतल्या पाहिजेत, असे मत अनंत सिंघानिया यांनी यावेळी व्यक्त केले.