Pune Shivsena News: पुणे महापालिकेच्या कारभाराविरुद्ध शिवसेनेचे आंदोलन; 'कॅग' मार्फत चौकशीची मागणी
पुणे महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील कामाची ‘कॅग’मार्फत (CAG) चौकशी करा, अशी मागणी पुण्यातील शिवसैनिकांनी केली आहे. पुणे महापालिकेच्या आवारात आंदोलन करत त्यांनी ही मागणी केली आहे.
Pune Shivsena News: पुणे महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील कामाची ‘कॅग’मार्फत (CAG) चौकशी करा, अशी मागणी पुण्यातील शिवसैनिकांनी केली आहे. पुणे महापालिकेच्या आवारात आंदोलन करत त्यांनी ही मागणी केली आहे. भारतीय जनता पार्टीची (Bhartiya Janata Party) सत्ता होती. त्यामुळे त्यांची सत्ता असलेल्या महापालिकेची कारभाराची चौकशीच्या मागणीसाठी पुण्यातील सेनेचे सर्व पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवक एकत्र आले होते.
मागील पाच वर्षात महानगर पालिकेने अनेक योजना आखल्या होत्या त्यात अनेक कोटींचा बक्कळ खर्च केला. मात्र तशा प्रकारचे कामं पुणे शहरात झाले नाहीत. पालिकेत सत्ता असताना भाजपने मोठा भ्रष्टाचार केला आहे. स्मार्ट सिटी, जायकाचा नदी सुधार प्रकल्पासारख्या योजनांचं काय झालं, असा प्रश्न शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला. यावेळी शिवसेने नेते सचिन अहिर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सचिन अहिर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावर देखील सचिन अहिर यांनी टीका केली केली आहे. आधी रामदेवबाबा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींचं कौतुक करत होते, मात्र आता त्यांचे विचार बदलले आहेत. जसं प्रॉडक्ट बदलतात तसं हे देखील प्रॉडक्ट आता बदलल आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
मनसे आणि भाजपची युती करायची गरज नाही, आधीच छुपी युती झालेली आहे. त्यात काय नवीन नाही. आता मनसेची अवस्था अशी झालेली आहे की ज्यांच्यासाठी ते भोंगा वाजवत होते त्यांना त्यांची गरज लागत नाही. म्हणून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी कधी तावडे असतील शेलार असतील हे भेटत आहेत. त्या दोघांच्या छुप्या युतीला सामना करण्याची ताकद शिवसेनेची आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होत असतो तेव्हा मनसेच्या नेत्यांनी चित्त मनाने भाषण ऐकावं. यंदाचा मेळावा मोठ्या दणक्यात उद्धवजींच्या नेतृत्वात होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.