Sushma Andhare: सुषमा अंधारेंना बोलावून घेतलं, कानात म्हणाला, 'माज आलाय का, नीट हिशेबात राहायचं'; विमानतळावर नेमकं काय घडलं?
Sushma Andhare: शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं ते आज पत्रकार परिषद घेत अंधारेंनी सांगितलं आहे.
पुणे: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना नागपूर विमानतळावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुषमा अंधारेंनी पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती. मात्र, त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत काय घडलं त्याबाबतची माहिती दिली आहे. नागपूर विमानतळाजवळ गाडीतून जाणाऱ्या एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी म्हटलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.(Sushma Andhare Death Threat At Nagpur Airport)
नेमकं काय घडलं?
पत्रकार परिषदेत घटनेची माहिती देताना सुषमा अंधारे म्हणाल्या, मुलीला पुण्यात सोडवं म्हणून मी फ्लाइट घेण्यासाठी निघाले होते. विमानतळावर पोहोचली होते. तेव्हा अर्ध टक्कल, गोलाकार टीकला लावला होता. तो माणूस माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितले तर तो जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. मी गेट 1 वर थांबले होते, एवढ्या वेळात हाका मारल्या. मला वाटलं सेल्फी घ्यायची असेल. हसत त्याने कानाजवळ म्हणाला, 'माज आला का? नीट, हिशोबात रहायचं. बोलणं कसं बंद करायचं आम्हाला कळत, असं म्हणून धमकी देऊन तो गेला. पहाटेच्या वेळी आपण काय करावं सुचत नव्हतं. मी डेअरिंग करत पुढं गेले.
दबाव तंत्राला मी भीक घालत नाही
त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावं. ती गाडी कोणाची आहे. सरळ-सरळ दम दिला जात आहे. दबावाच राजकारण आहे. अशा दबाव तंत्राला मी भीक घालत नाही. या दबाव तंत्राने मी घाबरून जाईल असं वाटत असेल तर असं होणार नाही. 15 वर्षात मला जिवंत जाळायचा प्रयत्न झालाय, विष प्रयोग झालाय. या रात्रीच्या प्रकरणाने मी घाबरली नाही. मात्र, मुलगी सोबत असल्यामुळे शांतपणे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला, असंही सुषमा अंधारेंनी पुढे म्हटलं आहे.
कोणा एका बड्या नेत्याला सोडायला आलेली असू शकते किंवा मी येणार आहे अशी माहिती मिळाल्यामुळे आलेली असू शकते. पांढऱ्या रंगाची इनोव्हा होती. त्यांनी मला धमकी दिल्यानंतर पुढे जाऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. हा कार्यकर्ता कोणत्या संघटनेचा माहिती नाही. सीसीटीव्ही फुटेज चेक करावं लागेल, तपासापर्यंत सीसीटीव्ही फुटेज गायब होवू नये हीच अपेक्षा आहे, असंही सुषमा अंधारे पुढे म्हणाल्यात.
परभणीच्या जाळपोळात ठरवून लोक घुसवण्यात आले. त्याला कारण मंत्रिमंडळ विस्तार होता. या सगळ्या लोकांनी परभणीत तणाव निर्माण केला. परभणीत जे पोलीस अधिकारी आहेत. भीमा कोरेगाव दंगलीवेळी असणारे पोलीस अधिकारी तिकडे देखील होते. गृह खात्यात मानसे पेरलेली आहेत. भीमा कोरेगाव जवळ आलेले आहे. जेव्हा जेव्हा भाजपची सत्ता येते तेव्हा, दलित आणि अल्पसंख्याक भेदरून जातात. विजयाचा उन्माद भीती उत्पन्न करणारी आहे, असा हल्लाबोल सुषमा अंधारेंनी भाजपला लगावला आहे. तर अचानक तोडफोडीचं वातावरण कसं झालं. मेघना बोर्डीकर, रत्नाकर गुट्टे यांनी परभणीचं पालकमंत्री पद मिळावं म्हणून या सगळ्या लोकांनी कुरघोडीचं राजकारण केलं त्यातला हा एक भाग असू शकतो, अशा शंका उपस्थित करत त्यासाठी तर प्रयत्न केला नाही ना? असा सवाल सुषमा अंधारेंनी व्यक्त केला आहे.