Sharad Pawar in Pune: मला श्रीयुत जरांगेंची एक गोष्ट अगदी पटते, रमेश केरेंसोबतच्या बैठकीत शरद पवारांनी बेधडक सांगितलं!
Maratha Aarkshan: आज 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, असा निर्णय न्यायव्यवस्थेने घेतला आहे. या निर्णयाची अडचण आली तर महाराष्ट्रातील सगळ्यांनी मिळून केंद्र सरकारमध्ये आग्रहाची भूमिका मांडावी, असा पर्याय शरद पवार यांनी सुचवला.
पुणे: मराठा आरक्षण ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटील यांनी सोमवारी पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी रमेश केरे-पाटील यांनी शरद पवार यांच्याशी आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी केरे-पाटील (Ramesh Kere Patil) यांना एक सल्ला दिला. केरे-पाटील यांच्या भेटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन या भेटीबाबतचा सगळा तपशील प्रसारमाध्यमांसमोर मांडला.
शरद पवार यांनी रमेश केरे-पाटील यांच्याशी चर्चा करताना म्हटले की, मला एक गोष्ट कटुता कमी होण्याच्यादृष्टीने वाचनात आली आणि ही गोष्ट योग्य आहे, असे मला वाटते. श्रीयुत जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न जसा मांडला तसाच त्यांनी धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण, मुस्लीम आरक्षण याबद्दलही भूमिका मांडली. याचा परिणाम इतर समाजांना जी चिंता होती, भीती होती, ती भीती जायला नक्की याची मदत होईल. हे सामंजस्य असंच सगळ्यांनी शिकावे, अशाप्रकारचा आग्रह मी रमेश केरे-पाटील यांना केला. त्यांनी एक प्रश्नही मला विचारला नाही. त्यांना मी जे काही बोललो, हे पटलं का नाही, हे मला माहिती नाही. पण मी सांगितल्यानंतर त्यांनी माझ्या हातात निवेदन दिले, त्याचा मी स्वीकार केला आणि ही बैठक संपली, असे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार हे चारवेळा मुख्यमंत्री होते. ते ज्येष्ठ आहेत, त्यांना विविध विषयांची जाण आणि अभ्यास आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं याबाबत शरद पवारांच्या पक्षाची भूमिका काय आहे, अशी विचारणा रमेश केरे पाटील यांनी केली होती. मात्र, शरद पवार यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी फार काही न बोलता मोदीबागेतून निघून जाणे पसंत केले.
मनोज जरांगेंना सर्वपक्षीय बैठकीला बोलवा: शरद पवार
गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे नेते मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आगपाखड करताना दिसत आहेत. मनोज जरांगे पाटील यांना शरद पवार यांची फूस असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. मात्र, शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा-ओबीसी आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीला मनोज जरांगे पाटील यांना निमंत्रण देण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्यांनी योग्य वाटतील त्या लोकांना बोलवावे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून बैठकीला हजर राहू, आमची भूमिका सहकार्याची राहील. हा प्रश्न मांडण्याच्याबाबत प्रकर्षाने ज्यांनी कष्ट घेतले त्या मनोज जरांगे पाटील यांनाही बैठकीला निमंत्रित करावे. दुसरा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणाचा, त्यांचे नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील, त्यांनाही बैठकीला निमंत्रित करावे, असा सल्ला मी मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
बीडमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काहीजणांना सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. हे कार्यकर्ते ठाकरे आणि पवार गटाचे असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी माझ्या नादी लागू नये, असेही राज ठाकरे यांनी म्हटले होते. याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, राज ठाकरेंनी दोन- तीन वेळा माझे नाव का घेतले हे मला कळलेले नाही. कारण मी या रस्त्याने कधीच जात नाही. मला माझा महाराष्ट्र थोडासा ओळखतो. माझी अशी पार्श्वभूमी नाही, मी कधीही आग्रह केलेला नाही करणार नाही. त्यांनी कारण नसताना माझे नाव घेतले आहे. मी पण आज महाराष्ट्रात फिरत आहे. माझ्या पण गाड्या अडवल्या आहेत. आता हे पण पवारांनी सांगितलंय का मला अडवा, असा सवाल शरद पवार यांनी विचारला.
VIDEO: शरद पवारांचं मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचं भाष्य
आणखी वाचा
मोठी बातमी : तुम्ही राज ठाकरेंची गाडी अडवायला लावली का, थेट प्रश्नावर शरद पवारांचं रोखठोक उत्तर