(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar On Kolhapur Violence : महाराष्ट्र हे संयमी आणि शांतताप्रिय राज्य, कोल्हापूरमध्ये जे घडलं ते राज्याच्या लौकिकाला शोभणारं नाही : शरद पवार
Sharad Pawar On Kolhapur Violence : "कोल्हापूरमध्ये जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात काल उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी दिली आहे.
Sharad Pawar On Kolhapur Violence : "कोल्हापूरमध्ये जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोल्हापुरात काल उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी (Kolhapur Violence) दिली आहे. "महाराष्ट्र हे संयमी आणि शांतताप्रिय राज्य आहे. कायदा हातात घेण्याची इथल्या लोकांची वृत्ती नाही. सर्वसामान्यांनी शासकीय यंत्रणेला सहकार्य करावं," असं शरद पवार म्हणाले. बारामती (Baramati) इथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
महाराष्ट्र हे संयमी आणि शांतताप्रिय राज्य : शरद पवार
शरद पवार म्हणाले की, "कोल्हापूरमध्ये (Kolhapur) जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाहीराज्यातील सर्वसामान्य जनतेला, विशेषत: ज्या ठिकाणी प्रकार घडला त्या ठिकाणच्या जनतेला आवाहन आहे की महाराष्ट्र हे संयमी आणि शांतताप्रिय राज्य आहे. इथल्या सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्यासंबंधीची प्रवृत्ती नाही. कुणीतरी काहीतरी करुन, जाणीवपूर्वक वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्यालाही माझा आक्षेप आहे. याची किंमत सामान्य माणसाला मोजावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी हे घडणार नाही याची काळजी घ्या. शासकीय यंत्रणेला सर्वसामान्य लोकांनी मनापासून सहकार्य करण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी या यंत्रणेला सहकार्य केलं तर ही अवस्था तातडीने बंद झालेली दिसून येईल. कोल्हापूरला सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामान्य माणसांच्या हिताची जपणूक केली पाहिजे."
व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे कोल्हापुरात वादाची ठिणगी
शिवराज्याभिषेक दिनाला कोल्हापूर शहरातील सात तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवले आणि इथेच वादाची ठिणगी पडली. या स्टेटसविरोधात काल (7 जून) हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. कार्यकर्ते आधी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले, नंतर ते मोर्चा काढणार होते. पण मोर्चा काढण्यास पोलिसांनी मनाई केली. यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि घोषणा देऊ लागले. कोल्हापुरात शिवाजी चौक परिसराला लागून असलेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या भाग, गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला तसेच शिवाजी रोड आदी ठिकाणी तोडफोडीच्या घटना समोर आल्या. अखेर त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. अश्रुधुराचाही वापरही करण्यात आला. दुपारी साडे बाराच्या सुमाराला स्थिती नियंत्रणात आली. या राड्यानंतर अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते आज रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला.