Sharad Pawar Dagdusheth Ganpati: नॉनव्हेज खाल्ल्याने शरद पवार 'दगडूशेठ'च्या दारातून माघारी
Sharad Pawar Dagdusheth Ganpati Visit : शरद पवार दगडूशेठच्या दर्शनाला आले, पण मंदिरात न येताच त्यांनी दारातूनच मुख दर्शन घेतलं. याची चर्चा आता रंगू लागली आहे.
पुणे: शरद पवार आज भिडे वाड्याची पाहणी केली आणि नंतर दगडूशेठ गणपतीचे मुख दर्शन घेतलं. भिडे वाड्याच्या पाहणीनंतर पवारांना मंदिरात येण्याची विनंती केली. मात्र नॉनव्हेज खाल्ल्याने शरद पवारांनी बाहेरुनच दर्शन घेतलं आणि ते रवाना झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात गेले. पण पवार गणपती बाप्पाचं दर्शन न घेताच बाहेरुन मुख दर्शन घेऊन निघून गेले. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. खरंतर शरद पवार दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी जाणार होते. मात्र आयत्यावेळी पवारांनी मंदिरात न जाण्याचा निर्णय घेत बाहेरुन दर्शन घेणं पसंत केलं. नॉनवेज खाल्लं असल्याने मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी न जाता बाहेरुन दर्शन घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
शरद पवार आज दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला येणार म्हणून अख्खा मीडिया सज्ज होता. पवारांची गाडीही आली पण पवार थेट उतरून शेजारीच असलेल्या भिडे वाड्यासमोर गेले. फुले दाम्पत्याने सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची पाहाणी केली आणि मगच त्यांची पावले दगडूशेठ गणपतीकडे वळली. पवार मंदिरात येणार म्हणून मीडियाची धावपळ उडाली. सगळे कॅमेरामन मंदिरात जागा मिळवण्यासाठी पळू लागले. आता पवार आत आले की आपल्या कॅमेऱ्यात सर्वात आधी दिसणार अशी जागा प्रत्येकाने हेरली. पण पाच मिनिटांनंतरही पवार आलेच नाहीत.
शरद पवार मंदिरात येणारच नाहीत अशी माहिती नंतर समोर आली. पवार मंदिराच्या उंबऱ्याबाहेरच उभे राहिले. मंदिर विश्वस्तांनी दारातच हार, तुरे आणि प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. पवारांनीही बाप्पासमोर हात जोडले
आणि तिथूनच ते रवाना झाले.
राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना ते नास्तिक आहेत आणि धर्म वगैरे मानत नाहीत असं म्हणाले होते. त्यानंतर आपण धार्मिक आहोत पण ती आपली खासगी गोष्ट असून त्याचं सार्वजिनकरित्या प्रदर्शन करत नसल्याचं प्रत्युत्तर पवारांनी दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आज पुणे दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यात त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दूरुन दर्शन घेतलं.