Pune Measles : पुणेकरांनो काळजी घ्या! शहरात गोवरचे सात संशयित रुग्ण
पुणे शहरात गोवराचे सात संशयित रुग्ण आढळून आले आहे. त्यांना नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या रुग्णांना ताप आणि अंगावर पुरळ अशी गोवराची लक्षणे आहेत.
Pune Measles : पुणे (pune) शहरात गोवरचे सात संशयित (Measles) रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या रुग्णांना ताप आणि अंगावर पुरळ अशी गोवरची लक्षणे आहेत. त्यांचे नमुने तपासणीसाठी मुंबईतील हाफकिन प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल येण्यास 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना गोवरचा संसर्ग झाला की नाही याचे निदान होईल.
राज्यात सध्या गोवरची साथ वेगाने पसरत आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही गोवरचे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी सुरु केली होती. त्यात आता सात गोवर संशयित बालके आढळून आली आहेत. ही संशयित बालके तीन ते बारा वयोगटातील आहेत.
102 अहवाल प्रलंबित
आरोग्य विभागाने या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत 226 गोवर संशयित बालकांचे नमुने तपासणीला पाठवले. त्यापैकी आतापर्यंत आठ जण गोवर पॉझिटिव्ह आढळून आले. मात्र ते रुग्ण ऑगस्ट ते सप्टेंबरमधील होते. त्यांचे अहवाल तीन डिसेंबरला आले. ते सर्व रुग्ण बरे देखील झाले आहेत. त्यामुळे 102 अहवाल प्रलंबित आहेत. ते अहवाल आल्यावर गोवरची साथ आहे की नाही हे सिद्ध होणार आहे.
शहरात गोवर सर्वेक्षणाला सुरुवात
पुणे शहरात गोवरच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. आतापर्यंत सात रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून नवनवीन उपाययोजना राबवल्या जात आहेत. रुग्णालयांमध्ये रुग्णांची सोय कशी केली जाईल, याकडे पालिका लक्ष देताना दिसत आहे. त्यासोबतच लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. शहरातील रुग्णालयाकडून गोवरच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली होती. त्याचा वेग आता वाढवण्यात आला आहे. प्रत्येक घरी जाऊन बालकांची तपासणी आणि चौकशी केली जात आहे आणि संशयित आढळल्यास त्यांच्यावर योग्यवेळी उपचार करण्याकडे पालिकेने विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील गोवरची परिस्थिती गंभीर
मागील चार वर्षांची राज्याची गोवरची परिस्थिती पाहता यावर्षी म्हणजेच 2022 या वर्षातील गोवरची परिस्थिती फारच चिंताजनक झाली आहे. 2019 मध्ये गोवरचा उद्रेक तीन पटींनी झाला होता. तर, 2020 मध्ये गोवरचा उद्रेक दोन पटींवर होता. 2021 मध्ये तर गोवरबाधित रुग्णांची संख्या आतापर्यंतची सर्वात कमी म्हणजेच एक पटींनी वाढली होती. 2022 मध्ये गोवर आजाराने कहरच केला आहे. ही संख्या आता 96 पटींनी वाढली आहे.