Pune News: 10 वर्षांच्या दिव्यांग मुलीला शोधण्यासाठी 300 पोलिसांचं सर्च ऑपरेशन, अपहरणाची शक्ता गृहीत धरून तपास अन्..., पुण्यात नेमकं काय घडलं?
Pune News: स्वातंत्र्य दिनाच्या रात्री पुणे पोलिसांकडून 24 तास सर्च ऑपरेशन राबवत या मुलीचा शोध घेण्यात आला. या शोधकार्यासाठी आयुक्तांसह जवळपास 300 ते 400 पोलीसांचा फौजफाटा कामाला करत होता.
Pune News: पुणे पोलिसांनी (Pune Police) आपली सतर्कता दाखवत बेपत्ता झालेल्या एका दहा वर्षांच्या दिव्यांग मुलीचा शोध घेऊन पुन्हा तिला तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केलं आहे. ही 10 वर्षांची चिमुरडी 14 ऑगस्टला दुपारी शिवतेज नगर बिबवेवाडी येथून बेपत्ता झाली होती. गौरी पटेल वय (10) ही मुलगी दिव्यांग असून बिबवेवाडी पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. तिला शोधण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे शोधले तेव्हा ती कात्रज परिसरातून गेल्याचे पोलिसांच्या (Pune Police) दिसून आले.
स्वातंत्र्य दिनाच्या रात्री पुणे पोलिसांकडून (Pune Police) 24 तास सर्च ऑपरेशन राबवत या मुलीचा शोध घेण्यात आला. या शोधकार्यासाठी आयुक्तांसह जवळपास 300 ते 400 पोलीसांचा फौजफाटा कामाला करत होता. यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास कात्रज चौकामध्ये अचानकपणे अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी एकत्रित आल्याने नागरिकांमध्येचर्चा सुरू होती. मात्र, रात्री 2 वाजता हरवलेली मुलगी कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरात सापडली त्यानंतर सर्व पोलिस अधिकारी अणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
तब्बल 24 तास उलटूनही ही 10 वर्षांची दिव्यांग मुलगी सापडत नसल्यामुळे पोलीस आयुक्त यांनी रात्रीच्या वेळी सर्व वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना कडक सूचना देत शोध मोहीम युद्धपातळीवर सुरु करण्याचे आदेश दिले. त्यांनी स्वतः कात्रज परिसरात येऊन परिसराची पाहणी केली. या मुलीचा तपास सुरू असतानाच तीचं अपहरण झालं असावं असाही अंदाज व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे तिचे फोटो आणि माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले होते.
याचवेळी गुन्हे शाखेच्या टीम व पोलिसांकडून (Pune Police) शोध सुरु असताना रात्री 1 वाजण्याच्या सुमारास बेपत्ता मुलगी कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्विगी डिलिव्हरी करणाऱ्या मुलाला आढळली. त्यांनी तिची माहिती पोलिसांना दिली. मुलगी सुखरूप असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
स्विगी डिलिव्हरी करणाऱ्या मुलाच्या तत्परने ती सापडली
ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीतील कामगार सौरभ भाऊसाहेब गोसावी (21) याने कात्रज भागात गुरुवारी मध्यरात्री दहा वर्षांच्या मुलीला पाहिलं. ही लहान मुलगी त्याला एकटी दिसल्याने त्याला संशय आला. त्याने याची माहिती पोलिसांना दिली. कोंढवा पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत चौकशी केली.त्यावेळी मुलगी बिबवेवाडीतून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्रीपासून अलर्ट मोडवर असलेल्या पोलिस यंत्रणेने निःश्वास सोडला. मुलीला पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या सौरभ गोसावीचे अधिकाऱ्यांनी कौतुक केलं.
चोवीस तास उलटून गेले तरी मुलगी सापडली नव्हती. विविध 40 ठिकाणी सीसीटीव्ही, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने हे सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. मुलगी सापडली असून ती सुखरूप आहे, असं पोलीस आयुक्त, अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.