Save Yuvaan | युवानला तुमच्या मदतीची गरज, दुर्मिळ आजार असलेल्या चिमुकल्यासाठी पालकांचा संघर्ष
युवानला स्पायनल मस्कुलर अॅट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला असून झोलगेन्स्मा ही लस त्याला द्यावी लागेल. त्याची किंमत तब्बल 16 कोटी आहे. 16 कोटी रुपये कुठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. उपचारासाठी त्याच्याकडे अवघे पन्नास दिवस आहेत. त्यामुळे त्याचे पालक मदतीचं आवाहन करत आहेत.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील एक वर्षाच्या चिमुकल्याला दुर्मिळ आणि भयावह आजाराने ग्रासले आहे. युवान असं या बाळाचं नाव असून, जगण्यासाठी त्याचा संघर्ष सुरु आहे आणि उपचारासाठी त्याच्याकडे अवघे पन्नास दिवस आहेत. युवानची या आजारातून सुटका करायची असेल तर त्यासाठी तब्बल सोळा कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. होय, सोळा कोटी रुपयांची लस दिली तरच युवान पुढचं आयुष्य ठणठणीतपणे जगू शकतो. पण युवानच्या कुटुंबियांचं उत्पन्न पाहता हा खर्च त्यांना न पेलवणारा आहे. म्हणूनच तू समाजाकडे मदतीची झोळी पसरवत आहेत. फूल न फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाने किमान शंभर रुपयांची मदत करावी असं आवाहन ते करत आहेत.
अमित आणि रुपाली रामटेककर या दाम्पत्याने वर्षभरापूर्वी युवानला जन्म दिला. रामटेककर कुटुंबीय आनंदात बागडत होतं. पण पुढं त्यांच्या आणि बाळाच्या नशिबी नियतीने काही मांडून ठेवलं असेल याची त्यांना पुसटशी कल्पना ही नव्हती. युवान मोठा होत असतानाच त्याच्या शरीरातील बदल हे असामान्य होते. इतर बाळांसारखी त्याची वाढ होत नव्हती. ही बाब त्यांनी डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा युवानला स्पायनल मस्कुलर अॅट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला असून झोलगेन्स्मा ही लस त्याला द्यावी लागेल. ही लसचं उत्पादन केवळ अमेरिकेत होते. शिवाय त्याची किंमत तब्बल सोळा कोटी असल्याचं त्यांना समजलं आणि रामटेककर कुटुंबियांना धक्का बसला. आई रुपाली गृहिणी आहे तर वडील अमित छोटासा व्यवसाय करतात. यातून महिन्याकाठी कसेबसे ते सत्तावीस हजारांची कमाई करतात. त्यामुळे सोळा कोटी रुपये कुठून आणायचे असा पर्वताहून मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. तरीही युवानच्या कुटुंबीयांनी हार मानलेली नाही. युवानच्या आयुष्यासाठी कुटुंबीयांनी लढा सुरु केला आहे. समाजातील प्रत्येकासमोर ते मदतीची याचना करत आहेत. चित्रपट-मालिकांमधील कलाकार, खेळाडू, उद्योगपतींसह समाजातील प्रत्येक घटकाला ते आवाहन करत आहेत. फूल न फुलाची पाकळी म्हणून सामान्यांनी किमान शंभर रुपयांची मदत करावी, असं ते साकडं घालत आहेत. राजकारण्यांनी देखील युवानसारख्या बाळांसाठी पुढाकार घेऊन, यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा आणि या आजारामुळे होणारी परवड थांबवावी अशी मागणी ही ते करत आहेत.
तुम्हीही वेदिकाच्या जिवासाठी शंभर रुपये द्या! 9 महिन्याच्या चिमुरडीचा जगण्यासाठी संघर्ष
युवानला या आजारातून बाहेर काढून, ठणठणीत करण्यासाठी अवघे पन्नास दिवस हातात आहेत. यासाठी आतापर्यंत अनेकांनी मदतीचा हात देखील पुढे केला आहे, पण अवघे पन्नास लाख रुपये जमा झाले आहेत. पण आणखी साडेपंधरा कोटींची गरज आहे, ती गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही एक हात पुढे करा आणि युवानच्या आयुष्याचा भाग व्हा!