तुम्हीही वेदिकाच्या जिवासाठी शंभर रुपये द्या! 9 महिन्याच्या चिमुरडीचा जगण्यासाठी संघर्ष
प्रत्येकी शंभर रुपये दिल्यास अवघ्या सोळा लाख जनतेतून ही रक्कम उभी राहू शकते. तेव्हा एक कोवळा जीव वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वेदिकाच्या आई-वडिलांनी केलंय.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या वेदिका शिंदे या 9 महिन्याच्या चिमुरडीचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. वेदिकाला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार झालाय. हा आजार होताच आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा या लहान चिमुरडीला दीर्घायुष्य हवं असेल तर तब्बल सोळा कोटी रुपयांची लस द्यावी लागणार असल्याचं समजलं. पण तिच्या आई-वडिलांसाठी ही रक्कम म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणून त्यांनी समाजाकडे मदतीची हाक दिली आहे.
प्रत्येकी शंभर रुपये दिल्यास अवघ्या सोळा लाख जनतेतून ही रक्कम उभी राहू शकते. तेव्हा एक कोवळा जीव वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वेदिकाच्या आई-वडिलांनी केलंय. ह्या आजारामध्ये खूप जलद गतीने बाळाच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. शिवाय जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना त्रास व्हायला सुरुवात होते आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो. वेदिका ही आत्ता नऊ महिन्यांची आहे आणि तिला या समस्या सुरू झाल्या आहेत. वेदिकावरती पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेदिकाला तातडीनं ही लस देण्याची आवश्यकता आहे. महिन्याभरात ही लस मिळाली तरच वेदिका पूर्णपणे ठणठणीत बरी होऊ शकते. झोलगेन्स्मा असं या लसीचं नाव आहे. ही लस अमेरिकेमधून आयात करावी लागणार आहे आणि या लसीची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची परिस्थिती वेदिकाच्या पालकांची नाही, ही लस मागवण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. कारण वेदिकाची आई गृहिणी आहे तर वडिलांची एक छोटी कंपनी आहे. ज्यात वाहनांचे स्पेअर पार्टस बनवले जातात. यातून त्यांना महिन्याकाठी सत्तर हजारांचा फायदा होतो, तर तीस लाखांचं कर्ज ही डोक्यावर आहे. हे पाहता एक रकमी सोळा कोटी रुपये जमा करणं त्यांच्यासाठी अशक्य आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन जास्तीजास्त मदत करावी, अशी हात जोडून ते विनंती करतायेत. आत्तापर्यंत अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढं केल्याने पंचवीस टक्के रक्कम जमा देखील झालीये. उर्वरित पंच्याहत्तर टक्क्याच्या मदतीमध्ये तुम्ही साक्षीदार व्हा आणि वेदिकाचं भविष्य उज्वल करा.