(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sasoon Hospital Drug Racket Pune : ललित पाटील ससूनमधून ड्रॅग्स रॅकेट कसं चालवत होता आणि पळून जाण्यात कसा यशस्वी झाला ?
ललित पाटील ससूनमधून ड्रॅग्स रॅकेट कसं चालवत होता आणि पळून जाण्यात कसा यशस्वी झाला? त्याला पळूव जाणं ससून रुग्णालयाचे व्यवस्थापन , येरवडा कारागृह प्रशासन आणि पुणे पोलीस यांच्या संगनमताशिवाय शक्य आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा (Pune Crime News) ड्रॅग माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. रविवारी ससून रुग्णालयाच्या गेटवर दोन कोटींच्या अमली पदार्थांसह ललित पाटीलच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली होती. (Sasoon Hospital Drug Racket Pune) अटकेतील आरोपीकडून जर ड्रॅग्स रॅकेट चालवलं जात असेल आणि ते उघड होताच तो पळून जात असेल? तर ते ससून रुग्णालयाचे व्यवस्थापन , येरवडा कारागृह प्रशासन आणि पुणे पोलीस यांच्या संगनमताशिवाय शक्य आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात सर्वसामान्यांना वैद्यकीय उपचार मिळोत अथवा न मिळोत पण अट्टल गुन्हेगारांना मात्र इथं ऐशोआरामात राहता येतं. यातीलच ललित पाटील नावाच्या ड्रॅग्स माफियांकडून या ससून रुग्णालयातून अमली पदार्थांची विक्री केली जात होती. पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं हे ड्रॅग्स रॅकेट उघडकीस आणून ललित पाटीलच्या दोन साथीदारांना ससूनच्या गेटवरच अटक केली. पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी ललित पाटील ससूनमधून पळून गेल्यानं प्रचंड खळबळ उडाली
अंमली पदार्थांची विक्रीच नाही तर मेफेड्रोनसारखा अंमली पदार्थ तयार करण्यात हातखंडा असलेल्या ललित पाटीलला पुणे जिल्ह्यातील चाकनमधून 2020 साली अमली पदार्थांची विक्री करताना अटक करण्यात आली. त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली खरी पण येरवडा कारागृहातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यानं आजारी असल्याचं नाटक रचलं आणि या ससून रुग्णालयात उपचारांसाठी म्हणून त्याची रवानगी करण्यात आली.
ससून रुग्णालयात कैद्यांसाठी असलेल्या 16 नंबर वॉर्डमध्ये त्याला ठेवण्यात आलं. या वॉर्डभोवती पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा चोवीस तास पहारा असतो . मात्र इथून त्यानं पुन्हा ड्रॅग रॅकेट चालवायला सुरुवात केली. त्यासाठी त्यानं या ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या रौफ शेखला हाताशी धरलं. त्याचबरोबर येरवडा कारागृहात ओळख झालेला सुभाष मंडल हा आणखी एक साथीदार त्याला येऊन मिळाला.
पोलिसांचा खडा पहारा असताना देखील कोट्यवधी रुपयांचं मेफेड्रोन ससूनच्या 16 नंबर वॉर्डमधील ललित पाटीलकडे बिनदिक्कतपणे पोहचत होतं. या मेफेड्रोनचे व्यवहार करण्यासाठी अनेक मोबाईल फोन देखील त्याच्याकडे उपलब्ध होते. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी सापळा रचला. साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्याने पुणे स्टेशन परिसरात शनिवारी सुभाष मंडलची भेट घेतली आणि मेफेड्रोन हवं असल्याचं सांगितलं.
सुभाष मंडलने ससूनच्या वॉर्ड नंबर 16 मध्ये बसलेल्या ललित पाटीलला व्हिडीओ कॉल लावला आणि गिऱ्हाईक बनून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्याकडील नोटा ललित पाटीलला दाखवल्या. त्यानंतर ललित पाटीलने दोघांना ससून रुग्णालयात बोलावलं. सोळा नंबर वॉर्डच्या खिडकीतून ललित पाटीलने मेफेड्रोन ठेवलेली बॅग खाली टाकली. रौफ शेख आणि सुभाष मंडलने ती उचलली आणि ते या ससूनच्या प्रवेशद्वारावर आले. मात्र इथं दाबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून तब्ब्ल दोन कोटी रुपयांचं मेफेड्रोन जप्त करण्यात आलं. मात्र ललित पाटील आधीच अटकेत असल्यानं नवीन गुन्ह्यात त्याचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला. पण लगेच दुसऱ्याच दिवशी ललित पाटीलच ऑपरेशन करावं लागणार आहे, असं ससूनमधील डॉक्तरांनी पोलिसांना कळवलं.
एक्स-रे काढण्यासाठी गेला अन् थेट पळाला...
त्यासाठी सोमवारी संध्यकाळी ललित पाटीलला एक्स-रे काढण्यासाठी ससून रुग्णालयातील एक्स-रे मशीन जिथे आहे तिथे नेलं जात असताना तो पोलिसांना धक्का देऊन पळून गेला, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पण ललित पाटील पळाला की त्याला पळून जायला सांगण्यात आलं, असा प्रश्न लगेच विचारला जात आहे. कारण ललित पाटीलच्या चौकशीतून त्याला साथ देणाऱ्या ससून रुग्णालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांची आणि अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची नावं उघड होण्याची शक्यता होती. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दोन मोबाईलचे पासवर्ड विसरल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं असल्यानं त्या मोबाईलमध्ये महत्वाची माहिती असण्याची शक्यता आहे .
ललितला भावाची साथ...
ललित पाटील हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील असून भूषण पाटील हा त्याचा भाऊ त्याला साथ देत असल्याचं उघड झालं आहे. ललित पाटीलच्या शोधासाठी अनेक पथकं रवाना करण्यात आली आहेत. याशिवाय सध्या पुणे पोलिसांकडे सांगण्यासाठी काहीही नाही. एरवी या ससून रुग्णालयात प्रवेश करायचा असेल तर सर्वसामान्यांची तपासणी केली जाते. अनेकांची इथं व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचं तक्रार असते. मात्र अट्टल गुन्हेगारांना मात्र इथं हवं ते सगळं कसं मिळतं? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.
वेगवेगळ्या आजाराची कारणं?
ललित पाटीलवर या ससून रुग्णालयात वेगवगेळे उपचार झाल्याच्या नोंदी आहेत. कधी त्याला टी बी झाल्याचं , कधी पोटात अल्सर झाल्याचं तर कधी त्याच हर्नियाच ऑपरेशन करण्याची गरज असल्याचा अहवाल ससूनच्या डॉक्तरांनी दिला आहे. एकाच व्यक्तीला एकाचवेळी इतके आजार कसे होऊ शकतात आणि इतका आजारी व्यक्ती पोलिसांच्या तावडीतून पळून कसा जाऊ शकतो, असा भाबडा प्रश्न एनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. सासूचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी मात्र याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
ससूनमध्ये जो काळाबाजर चालतो तो संपेल का?
ललित पाटील हा या प्रकरणातील आरोपी आहे. पण ससूनचं व्यवस्थापन, येरवडा कारागृहाच प्रशासन आणि पुणे पोलिसांना त्यानं संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ललित पाटील कदाचित पुन्हा पकडला जाईलही , पण त्याला साथ देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं खरंच समोर येतील का ? या ससूनमध्ये जो काळाबाजर चालतो तो संपेल का? अंमली पदार्थांचा विळखा तरुणाईभोवती वाढत चालला असताना ज्यांच्यावर हा विळखा सोडवण्याची जबाबदारी आहे ते पोलीस आणि डॉक्टरच एका ड्रॅग माफियाला साथ देत असतील तर मग अपेक्षा कोणाकडून ठेवायची ?, असा प्रश्न कायम राहतो.
इतर महत्वाची बातमी-