(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : आजचे मोदी हे बाळासाहेब ठाकरेंची कृपा, पुण्यात संजय राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केलाय.
पुणे : आजचे मोदी (Narendra Modi) हे बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) कृपा असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. पुण्यात ठाकरे गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान या मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी हजेरी लावली होती. पुण्यातील आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर ठाकरे गटाकडून जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देखील हजेरी लावली होती.
संजय राऊतांनी काय म्हटलं?
गुजरातमधील दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयी मोदींना मुख्यमंत्री पदावरुन काढायचं म्हणत होते. राजधर्माची आठवण करुन द्यायला अटलजी विसरले नव्हते. पण जेव्हा अडवाणी बाळासाहेब ठाकरेंना विचारायला आले होते तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया. तुम्ही नरेंद्र मोदींना काढू नका. जेव्हा अख्ख जग टीका करत होतं, तेव्हा बाळासाहेबांनी हे सांगितलं होतं. पण आता देश म्हणतोय की, नरेंद्र मोदी वापस आया तो पुरा देश गया. त्यामुळे मोदी जर पुन्हा आले तर लोकशाही, स्वातंत्र्य सर्व काही जाईल, असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
ही शिवसेना उसळता सागर - संजय राऊत
ही शिवसेना हा उसळता सागर आहे. पुण्याच्या मैदाना ही शिवसेना कशी उतरते बघा, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना देखील थेट इशारा दिलाय. आम्हाला शिल्लक सेना म्हणता. 2024 नंतर तुम्हीच शिल्लक राहणार का हा विचार करा. या महाराष्ट्रात ज्याला शिल्लेक सेना म्हणती तीच सेना आम्ही पुन्हा सत्तेवर आणून दाखवू, असं संजय राऊतांनी म्हटलं.
देशाच्या बाहेर जो काळा पैसा गेला त्याचं काय झाल?
या देशाचा काळ पैसा जो बाहेर गेला त्याच काय झालं, असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केलाय. 15 लाखाचा काय झालं,भ्रष्टाचारांना फासावर लटकावू उद्याचं काय झालं, अजित पवार हसन मुश्रीफ यांचं काय झालं, प्रफुल पटेल भावना गळी राहुल शेवाळे यांचे काय झालं. ईडी त्यांना अटक करायला गेली होती, त्याचं काय झालं, हे प्रश्न देखील राऊतांनी या निमित्ताने उपस्थित केले आहेत. देशातला दहशतवाद पूर्णापणे संपवू असं सांगितलं होतं मणिपूर मध्ये काय सुरू आहे. आम्हाला डोळे वटारुन दाखवता चीनला डोळे वटारा, असं संजय राऊतांनी म्हटलं.
एक नंबरचं खोटं सरकार देशात आहे - संजय राऊत
आजही हजारो काश्मीर पंडित निर्वासितांचे जीवन जगतात, काश्मिरी पंडितांच काय झालं ते सांगा. अनेक काश्मिरी पंडित बाळसाहेब ठाकरे यांना मानतात. कारण बाळासाहेबांनी कश्मीरी पंडितासाठी काम केलं याला म्हणतात हिंदुहृदयसम्राट. समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार होतात कुठे आहे पुतळा. हे एक नंबरचं खोटं सरकार देशात आहे, असं राऊतांनी म्हटलं. डरपोक लोकांनी शिवसेना घाबरून शिवसेनेला फोडलं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी काय केलं मराठी माणसाच शौर्य संपवण्याच काम केलं. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले हे त्यांच्या मनात आहे, असं राऊतांनी म्हटलं.
राज्यात सध्या एक फूल दोन डाऊट फूल - संजय राऊत
शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच.ही शिवसेना कुण्या आयऱ्या गौऱ्याची नाही. आशा एकनाथ शिंदेंना देता आणि तुम्ही सांगता का ही शिवसेना तुमची? शरद पवार साहेब हयात आहेत, निवडणूक आयोगासमोर जाऊन बसतात तरी निवडणूक आयोगाला प्रश्न पडला की राष्ट्रवादी कोणाची. उद्धव ठाकरे असताना निवडणूक आयोगाला प्रश्न पडतो की शिवसेना कुणाची, राज्यात सध्या काय सुरू आहे एक मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री, एक फुल दोन डाऊट फुल, असं म्हणत राऊतांनी सरकारवर निशाणा साधला.
शिवसेनेशी बेईमानी करण्यापेक्षा मरण पत्कारीन - संजय राऊत
मला जेलमध्ये नेले तेव्हा माझ्यावर देखील दबाव आणला गेला..पण मी शिवसेना सोडणार नाही. शिवसेनेची बेईमानी करण्यापेक्षा मरण पत्कारीन. मी घाबरून पळून जाणार नाही. 40 डरपोक पळून गेले पण लाखो मर्दानी सैनिक आमच्या सोबत, हा महाराष्ट्र झुकणार नाही. असे शिंदे मिंदे किती आले आणि गेले. या देशात अनेक सेना आल्या पण शिवसेना आजही तशीच आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं.