Pune Rain: पुण्यात अवकाळीची हजेरी; मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात, चार दिवस येलो अलर्ट
Pune Rain: सकाळपासून पुणे शहरात ढगाळ वातावरण होतं आणि साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

पुणे: राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आली आहे. पुणे शहरासह परिसरात कालपासून (सोमवारी) अवकाळी सरी बरसल्या. आज (मंगळवारी)देखील शहराच्या मध्यवर्ती भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (मंगळवारी) सकाळपासून पुणे शहरात ढगाळ वातावरण होतं आणि साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पुण्यात पुढील काही दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता
पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मॉन्सून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 6 जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 27 मे रोजी केरळ मध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मॉन्सून 6 जून आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस होताना दिसतोय तसेच येत्या ५ दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.
पुण्यात चार दिवस 'येलो' अलर्ट
पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे, तर पुढील चार दिवसांत कमाल तापमानामध्ये किंचित घट होणार असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे पुणे शहराला पुढील चार दिवस 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात
मुंबईच्या पश्चिम उपनगरात (Rain In Mumbai) सकाळच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. आज (13 मे) पश्चिम उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर सकाळी 9 वाजल्यानंतर मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी,जोगेश्वरी,गोरेगाव मालाड,कांदिवली,विलेपार्ले, सांताक्रुझ, परिसरात सध्या जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुंबईला आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवार)साठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दक्षिण कोकणामध्येही ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाचा ॲलर्ट देण्यात आला आहे.
तळकोकणात सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा, इन्सुली, आकेरी परिसरात काल जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला. सिंधुदुर्गात काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी उष्णता जाणवू लागली आहे.
नाशिकमध्ये सलग पाचव्या दिवशी अवकाळीने झोडपलं
सलग पाचव्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसाने झोडपून काढले काल दुपारच्या सुमारास नाशिक शहरात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नाशिक शहराच्या मध्यवस्तीतील रस्त्यांना अक्षरशः नदी नाल्याचा रूप आलं होतं. अचानक आलेल्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं तर, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली 15 ते 20 मिनिट नाशिककरांना पावसांने झोडपून काढले.
























