Pune Crime News : इन्स्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्यावरुन दोन गटात हाणामारी; पुण्यातील घटना
पुण्यात इन्स्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्यावरून विद्यार्थ्यांच्या गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील उरुळी कांचन येथे असलेल्या कॉलेजच्या बाहेरच विद्यार्थ्यांचा राडा बघायला मिळाला आहे.
Pune Crime News : शिक्षणाचं माहेरघर अशी पुण्याची (Pune Crime) ओळख होती. मात्र शहरातील गुन्ह्यांची संख्या पाहता शिक्षणाचं माहेरघर ही ओळख पुसट होत आहे. पुण्यात इन्स्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्यावरून विद्यार्थ्यांच्या गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील उरुळी कांचन येथे असलेल्या कॉलेजच्या बाहेरच विद्यार्थ्यांचा राडा बघायला मिळाला आहे.
एक वर्षापूर्वी झालेल्या प्रेम प्रकरणावरून अल्पवयीन मुलांमध्ये झाला वाद होता. त्यातून दोन गटात वादावादी झाली. वादाचं रुपांतर तुंबळ हाणामारीत झालं. दोन गटात झालेल्या हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात काल परस्परविरोधी गुन्हे दाखल असून 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनीभाई देसाई महाविद्यालयाच्या परिसरात इन्स्टाग्रामवर स्टेटस वरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ मारामारी झाली.
प्रेम दत्तात्रय कांचन, रुषिकेश चांदगुडे, प्रथमेश दत्तात्रय कांचन, जयेश सुदाम कांचन, चैतन्य अप्पासो महाडीक आणि तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील एक अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र हे उरुळी कांचन पद्मश्री मनिभाई देसाई ज्युनिअर कॉलेज येथे मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी तिथे दुसऱ्या गटातील काही विद्यार्थी आले आणि त्यांनी त्याला इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर पुष्पा सिनेमा स्टाईलसारख्या ठेवलेल्या स्टेटस बाबत त्याला जाब विचारला. त्याचे कारण सांगण्यास त्याने नकार दिला असता आरोपींनी त्याला आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करुन मारहाण केली. यातील एका जणांनी हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना मारहाण करुन जबर जखमी केले. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये दहावीतील विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल झाला होता. एका महिलेने मध्यस्थी केल्यानं हा वाद काही काळात शमला. शाळेतील किरकोळ वादावरून ही भांडणं झाल्याचं बोललं जात होतं. पुणे हे शिक्षणाचे माहेर घर समजलं जातं मात्र याच पिंपरी चिंचवडमध्ये एका महाविद्यालयाच्या परिसरातून व्हिडीओ समोर आला होता. विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. या हाणामारीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. या सगळ्या घटनांमुळे पुण्यात किरकोळ वादातून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.