Pune Unlock : पुणे आजपासून अनलॉक; निर्बंधात शिथिलता, पुणेकरांना दिलासा
पुणे शहरातील सर्व व्यवहार हे सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार असून शनिवार व रविवारी या गोष्टी दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु राहतील. शहरातील हॉटेल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत
Pune Unlock : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरु राहणार आहेत तर शहरातील हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त शनिवारी आणि रविवारी या सर्व गोष्टींना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शहरातील मॉल्स रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. पण मॉलमध्ये लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
शहरातील सर्व हॉटेल चालकांना आणि दुकानदारांना कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जलतरण तलाव वगळता इतर आऊटडोअर खेळांना परवानगी देण्यात आली आहे तसेच पुण्यातील उद्यानंही त्यांच्या वेळेनुसार सुरु राहणार आहेत.
राज्यातील कोरोनाच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणत अनलॉकबाबत नवीन नियमावली जारी करण्यात आली होती. त्यामध्ये राज्यातील 36 पैकी 25 जिल्ह्यांना दिलासा देण्यात आला होता तर उर्वरित 11 जिल्ह्यांमधील निर्बंध कायम होते. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश असल्याने या ठिकाणचा व्यापारी वर्ग नाराज झाला होता. गेल्या चार दिवसांपासून व्यापाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून पुण्यातील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी केली. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल दुपारी तीन वाजता एक आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर पुणेकरांना निर्बंधात सूट देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
सध्या पुण्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा 3.3 इतका आहे तर पिंपरी चिंचवडचा पॉझिटिव्हिटी दर हा 3.5 टक्के इतका आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांना कोरोनाच्या निर्बंधातून सूट जरी मिळाली असली तरी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन त्यांनी करावं असं आवाहन पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यातील पॉझिटिव्हिटी दर जर 7 टक्क्यांच्या वर गेला तर पुन्हा निर्बंध लावण्यात येतील असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- CM Uddhav Thackeray on Covid19: 15 ॲागस्टपासून कोविडचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार : मुख्यमंत्री
- CM Speech Highlights : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे दहा मुद्दे!
- Maharashtra Corona Cases: राज्यात आज 4,895 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 5,508 रुग्ण कोरोनामुक्त